दर्शनरांगेत पाणी, चहा, खिचडीची सोय; रांगेतील भाविकांसाठी अभंग ऐकण्याची सोय
By Appasaheb.patil | Published: July 16, 2024 07:30 PM2024-07-16T19:30:54+5:302024-07-16T19:31:12+5:30
तासनतास दर्शनासाठी रांगेत उभे राहणाऱ्या भाविकांना संतांचे अभंग ऐकण्याची सोयही मंदिर समिती प्रशासनाने केल्याने भाविकांचा थकवा दूर होताना दिसत आहे.
सोलापूर : आषाढी यात्रेसाठी पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना सुलभ दर्शन मिळावे आणि दर्शन रांगेत पिण्याचे पाणी, चहा आणि उपवासाची खिचडीचे वाटप विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीकडून करण्यात येत आहे. तासनतास दर्शनासाठी रांगेत उभे राहणाऱ्या भाविकांना संतांचे अभंग ऐकण्याची सोयही मंदिर समिती प्रशासनाने केल्याने भाविकांचा थकवा दूर होताना दिसत आहे.
उद्या आषाढी एकादशीचा सोहळा होत आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकरी रांगेत उभे असून दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत पोहोचली आहे. सध्या पंढरपूर शहरात १५ लाखांहून अधिक भाविक दाखल झाल्याचा अंदाज पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय महापूजा होणार आहे. या शासकीय महापूजेला मानाचे वारकरीही असणार आहेत. विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन पायी वारी करीत आलेल्या दोन्ही संतांच्या मानाच्या पालख्या पंढरपुरात दाखल झाल्या आहेत.
आषाढी यात्रा कालावधीत भाविकांना आवश्यक व मुबलक सोयी-सुविधा मंदिर समितीच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामध्ये दर्शनरांगेत बॅरीकेटींग करून त्यावर ताडपत्री शेड, जादा पत्राशेडची निर्मिती, आपत्कालीन गेट, विश्रांती कक्ष, फॅब्रिकेटेड शौचालये, बसण्याची सुविधा, लाईव्ह दर्शन, कुलर-फॅन, मिनरल वॉटर, चहा वाटप करण्यात येत असल्याची माहिती सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी यावेळी दिली.