माढा मतदारसंघात रस्ते, इमारतीसाठी अर्थसंकल्पात ४४ कोटींची तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:41 AM2021-03-13T04:41:34+5:302021-03-13T04:41:34+5:30
माढा विधानसभा मतदारसंघातील माढा पंढरपूर माळशिरस या भागातील रस्ते पक्के करण्यासाठी निधी मिळण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मतदारसंघातील रस्ते ...
माढा विधानसभा मतदारसंघातील माढा पंढरपूर माळशिरस या भागातील रस्ते पक्के करण्यासाठी निधी मिळण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मतदारसंघातील रस्ते दुरुस्तीसाठी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता. त्यानुसार रस्ते दुरुस्तीसाठी २४ कोटी, माढा प्रशासकीय इमारतीकरिता दहा कोटी रुपयांची, तर अतिवृष्टीने खराब झालेल्या रस्ते व पुलांच्या तीन तालुक्यांतील कामांसाठी दहा कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली असून, या रस्त्याच्या कामामुळे वाड्यावस्त्या, गावे मुख्य रस्त्यांना जोडल्यास दळणवळण सुलभ होण्यास मदत होणार आहे.
या सर्व रस्त्यांच्या कामासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे सहकार्य मिळाल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले.
अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेले रस्त्याचे नाव व निधी
माढा ते शेटफळ-५ कोटी, चिंचोली ते माढा रस्ता-१.५० कोटी, बेंबळे ते परिते रस्ता -१.५० कोटी, निमगाव ते पिंपळनेर-उजनी (मा) रस्ता-१.५० कोटी, प्रजिमा-१२८ ते प्रजिमा-१२९ चांदज रस्ता-१ कोटी, परिते ते पडसाळी रस्ता-१.५०, सुलतानपूर ते जामगाव रस्ता ३ कोटी, सापटणे ते उपळाई (बु) रस्ता-२ कोटी, केवड ते मानेगाव रस्ता पूल बांधणे १ कोटी ४८ लाख, माढा-वडशिंगे-पापनस रस्ता पुलाचे बांधकाम करणे. २ कोटी ७१ लाख, भोसे-शेवते-पटवर्धन कुरोली रस्ता ३ कोटी.
----------
चौकट -
माढ्यातील प्रशासकीय बांधकाम इमारतीसाठी दहा कोटींची तरतूद
माढा येथे प्रशासकीय भवन बांधण्यासाठी गेल्या वर्षी राज्य शासनाने १३ कोटी रुपयांचा अंदाजपत्रकास मान्यता दिलेली होती मार्च २०२० मध्ये या इमारतीच्या बांधकामास तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्यानुसार इमारतीचे नकाशे, इतर बाबी पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. चालू वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उर्वरित दहा कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केल्यामुळे प्रशासकीय भवनचे काम दिलेल्या वेळेत पूर्ण होईल. याचबरोबर माढा नगरपंचायतीसाठीदेखील इमारतीचे बांधकाम व शहरातील इतर विकासकामांनाही निधी वितरित करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरविकास विभागास दिलेल्या आहेत. या कामांसाठी लवकरच निधी मिळेल यामुळे माढा येथे सुसज्ज व अत्याधुनिक अशा इमारती शहराच्या वैभवात भर पाडतील असा विश्वास आमदार बबनराव शिंदे यांनी व्यक्त केला.