जनआरोग्य योजनेचा सोलापूर जिल्ह्यातील ६१ हजार रुग्णांना लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 04:40 PM2018-07-10T16:40:52+5:302018-07-10T16:44:57+5:30
सहा वर्षे पूर्ण : सोलापूर जिल्ह्याला मिळाले २२२ कोटी
सोलापूर : महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा सोलापूर जिल्ह्यातील ६० हजार ५०९ रुग्णांनी लाभ घेतला आहे. या माध्यमातून उपचारापोटी रुग्णालयांना २२२ कोटी ५५ लाख ९६ हजार रुपये मिळाले आहेत.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेला (पूर्वीचे नाव राजीव गांधी जीवनदायी ) २ जुलै रोजी सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. २ जुलै २०१२ रोजी ही योजना राज्यातील ८ जिल्ह्यांत त्यानंतर २१ नोव्हेंबर २०१३ रोजी २८ आणि ३ जून २०१६ रोजी इतर १४ जिल्ह्यात ही योजना लागू करण्यात आली. सोलापूरचा सुरुवातीलाच समावेश करण्यात आला होता.
एम. डी. इंडिया कंपनीतर्फे क्लेम स्वीकारले जातात. यासाठी सोलापूर जिल्ह्यात २४ रुग्णालयात ही सोय करण्यात आली आहे. प्रामुख्याने २८ आजारांवर आतापर्यंत उपचार केले गेले आहेत. पिवळे व केशरी रेशनकार्ड धारकांना या योजनेंतर्गत उपचाराची सुविधा देण्यात आली आहे. अशा रेशन कार्डमध्ये नाव असलेले रुग्ण उपचारासाठी संबंधित रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्याची नोंद घेण्यासाठी आरोग्यमित्र २४ तास उपलब्ध आहेत.
रुग्णाची नावनोंदणी करून ओळखपत्र व रेशनकार्डाची खातरजमा करून उपचाराची व्यवस्था करण्याची जबाबदारी आरोग्य मित्रांवर आहे. रुग्णांच्या अडचणी सोडविण्यासाठी आरोग्य विभागातर्फे जिल्हा समन्वयक म्हणून डॉ. रमेश सोनवणे व एम. डी. कंपनीतर्फे निवृत्त पोलीस अधिकारी शिवशरण गवंडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यभरात या योजनेचा १७ लाख १० हजार १५० रुग्णांनी लाभ घेतला आहे. त्यांच्या उपचारासाठी ३७८४ कोटी ८८ लाख ४० हजार ६२१ इतकी रक्कम क्लेमपोटी रुग्णालयाकडे जमा करण्यात आली आहे.
ग्रामीण भागात होत आहे जनजागृती
- या योजनेतून असाध्य आजारांवर उपचार घेण्याबाबत ग्रामीण भागात जनजागृती झाली आहे. पिवळे व केशरी रंगाचे रेशनकार्ड असणारे सदस्य आपल्या आजारावर जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत तपासणी करून उपचार घेत आहेत. यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक व महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. महिलांमध्ये मासिक पाळी, पोटाचे विकार व कर्करोगाच्या आजारांचा समावेश आहे. ज्येष्ठ नागरिकांना हृदयासंबंधी येणाºया अडचणींवर विविध रुग्णालयात उपचार सुविधा देण्यात येत आहे.
पोलीस खात्यातून निवृत्त झाल्यावर समाजसेवा म्हणून या कंपनीचे काम स्वीकारले. आतापर्यंत अनेक गरजूंना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य केले. कोणास अडचणी येत असतील तर संपर्क करावा.
- शिवशरण गवंडी,
जिल्हाप्रमुख, आरोग्य विमा