सुभाष देशमुखांच्या निवासस्थानी नितीन गडकरी यांनी केले लोकयात्री सुभाष देशमुखांच्या पुस्तकाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 04:47 PM2019-08-01T16:47:26+5:302019-08-01T16:57:53+5:30
गडकरींनी देशमुखांच्या निवासस्थानी केले प्रकाशन; भोवळ आल्याने जाहीर कार्यक्रम झाला होता रद्द
सोलापूर : प्रकृती अस्वास्थ्यामुळे नितीन गडकरी यांनी सर्व जाहीर कार्यक्रम रद्द केले, मात्र लोकयात्री सुभाष देशमुख या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या होटगी रोडवरील निवासस्थानी पार पडला.
अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना भोवळ आली होती. त्यामुळे त्यांचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. कुलगुरु डॉ़ मृणालिनी फडणवीस यांच्या निवासस्थानी विश्रांती घेतल्यानंतर नितीन गडकरी यांना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांची पुन्हा तपासणी केली.
यानंतर गडकरींनी तासभर विश्रांती घेतली. या विश्रांती घेतल्यानंतर जेवण केले. जेवणानंतर देशमुखांच्या निवासस्थानी लोकयात्री सुभाष देशमुख या पुस्तकाचा औपचारिक कार्यक्रम पार पडला. यावेळी सांगलीचे खासदार संजय पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, महापौर शोभा बनशेट्टी, निरुपणकार विवेक घळसासी, भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, रोहन देशमुख, इंद्रजित पवार, उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या सभापती संध्याराणी पवार, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या रेणुका महागांवकर, समर्थ बँकेचे संचालक प्रशांत बडवे, राज्य बँकेचे प्रशासकीय संचालक अविनाश महागांवकर, कृषीमुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्यासह सहकारमंत्री देशमुख कुटूंबातील सदस्य उपस्थित होते.