उजनीचा खळाळता प्रवाह पाहण्यासाठी पर्यटकांचा ओढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 06:36 PM2019-08-21T18:36:19+5:302019-08-21T18:45:24+5:30
पोलीस बंदोबस्त वाढविला; निसर्ग सौंदर्य टिपण्यासाठी दररोज तीन हजार पर्यटकांची गर्दी
भीमानगर : सहा आॅगस्ट रोजी उजनी धरण भरले. येथील निसर्ग सौंदर्य टिपण्यासाठी सोलापूरसह पुणे जिल्ह्यातील पर्यटकांची उजनी धरण परिसरात एकच गर्दी झाली आहे. यामुळे धरण प्रशासनावर ताण तर वाढलाच, शिवाय पोलीस बंदोबस्तही वाढवावा लागला आहे.
पुणे परिसरात झालेल्या पावसामुळे उजनी धरण भरले़ हे पाणी पुढे सोडावे लागले़ आॅगस्ट महिन्यात सुट्या जोडून आल्याने निसर्ग सौंदर्य टिपण्यासाठी शाळा व कॉलेजच्या तरुण वर्गानेही धरणाकडे धाव घेतली़ नोकरदार, विद्यार्थी हे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वरून जाताना वळून धरणाकडे धाव घेत आहेत. या परिसरात फोटोसेशन, सेल्फी रंगलेला दिसतोय. धरणातील फेसाळते पाणी, हवेतील थंंडावा आणि मनोहारी दृश्य अनुभवताहेत. विशेषत: सहकुटुंब हा आनंद लुटण्यासाठी गर्दी होत आहे.
परिणामत: या परिसरात हॉटेल व्यवसाय चांगलाच भरभराटीला आला आहे. दिवसभरात जवळपास तीन हजार पर्यटक उजनी धरण पाहण्यासाठी येत आहेत. धरण परिसरात छोटे-मोठे हातगाड्यांवर खाद्यपदार्थ विकणाºया व्यावसायिकांनीही गर्दी केली आहे. पर्यटकांकडून धरणाचे कौतुक होतंय.
हिरवळ खुणावतेय...
- सध्या श्रावणधारांनी उजनी धरण परिसरात हिरवळ दाटली आहे. चोहीकडे या परिसराने निसर्गाला जणू हिरवा शालू परिधान केल आहे. यामुळे पर्यटकांना या ठिकाणी आले की बराच वेळ थांबावेसे वाटते आहे. या ठिकाणी खाद्यपदार्थही उपलब्ध होत असल्याने पर्यटकांची चांगलीच व्यवस्था झाली आहे़ बहुतांश पर्यटक हे दुचाकी आणि चारचाकी घेऊन परिसरात सहकुटुंब दाखल होताहेत़
उजनी धरण व्यवस्थापन विभागाने या ठिकाणी कोयना धरणाच्या धर्तीवर उजनीवर पर्यटकांसाठी मोठी बागबगिचा निर्माण करावी़ तसेच कारंजा, स्लाईड शो निर्माण करावा़ पुणे-सोलापूर हायवेलगत हे धरण असल्याने शासनाला मोठा महसूल मिळू शकतो.
- अंबादास कोथाळे, पर्यटक, पुणे