पंपहाऊसमध्ये बिघाड; सोलापूर शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 02:48 PM2019-02-19T14:48:26+5:302019-02-19T14:51:15+5:30
सोलापूर : गेल्या दोन दिवसांपासून टाकळी आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या मागील पंपहाऊसमध्ये बिघाड झाल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. दोन ...
सोलापूर : गेल्या दोन दिवसांपासून टाकळी आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या मागील पंपहाऊसमध्ये बिघाड झाल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. दोन दिवसांत तो सुरळीत होईल, असा विश्वास पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांनी व्यक्त केला.
टाकळी येथील चारपैकी एक पंप शनिवारी सकाळी बंद पडला होता. त्याच्या दुरुस्तीसाठी २४ तास लागले. टाकळीनंतर रविवारी हायलेव्हल पंप हाऊसमधील पंप बंद पडला. त्याचाही परिणाम पाणी उपशावर झाला. यामुळे विजापूर वेस, लोधी गल्ली, लष्कर, रविवार पेठ, गांधीनगर,२५६ गाळे, कवितानगर, गवई पेठ आदी भागांना एक दिवस उशिरा पाणीपुरवठा झाला. अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातूनही पाण्याची ओरड झाली. या भागांना मंगळवारी पाणी देण्यात येईल, असे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी सिद्धेश्वर उस्तुरगे यांनी सांगितले. दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.
नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करुन महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.