सोलापूर शहरातील २२ टॉवेल कारखानदारांना पुण्याच्या कापड व्यापाºयांने गंडवले, २६.८५ लाखांची झाली फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:29 PM2018-01-24T12:29:15+5:302018-01-24T12:30:10+5:30
पुण्याच्या कापड व्यापाºयाने सोलापुरातील २२ टॉवेल कारखानदारांकडून घेतलेल्या मालापोटीची रक्कम न देता २६ लाख ८५ हजार ९७८ रुपयास गंडवल्याबद्दल आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हा नोंदला आहे.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २४ : पुण्याच्या कापड व्यापाºयाने सोलापुरातील २२ टॉवेल कारखानदारांकडून घेतलेल्या मालापोटीची रक्कम न देता २६ लाख ८५ हजार ९७८ रुपयास गंडवल्याबद्दल आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हा नोंदला आहे. हा प्रकार १ ते २९ जून २०१७ या कालावधीत घडला आहे. दीपक जैन असे गुन्हा नोंदलेल्या व्यापाºयाचे नाव आहे.
सोलापूरचे कारखानदार प्रभाकर रामकृष्ण सोमनाथ (रा. ५२३, साखर पेठ, सोलापूर) यांचा टॉवेल तयार करण्याचा कारखाना आहे. जुळे सोलापूर येथे राहणारे सोमनाथ वाले यांच्यामार्फत दीपक जैन या पुण्याच्या रेडिमेड व्यापाºयाशी त्यांची ओळख झाली. दीपक जैन हे वाले यांना रेडिमेड कपडे पुरवत असत. त्यांच्या सांगण्यावरून जैन यांच्या नाकोडा एंटरप्रायजेस व रत्नदीप टेक्स्टाईल, पुणे यांना फिनिक्स क्लासिक, उंदरी चौक, ता. हवेली, जि. पुणे या पत्त्यावर टॉवेल पुरवणे व रोखीने पैसे घेणे हा व्यवहार सुरू झाला. पहिले सहा महिने रोखीने व्यवहार झाला. यातून विश्वास निर्माण झाल्याने कधी रोखीने, कधी बँक खात्यावर पैसे जमा व्हायचे. जून २०१७ नंतर मात्र पैशास विलंब व्हायला लागला. फोन करूनही काही दिवसात पैसे मिळतील, असे सांगत कालांतराने टाळणे सुरू झाले.
यावर प्रत्यक्ष पुणे येथे त्यांच्या फर्मशी संपर्क साधला असता ते बंद असल्याचे लक्षात आल्याने आपली फसवणूक झाल्याबद्दल सोमनाथ यांनी आपली २ लाख ५९ हजार २८० रुपये फसवणूक झाल्याबद्दल आर्थिक गुन्हे शाखेकडे संपर्क साधून फिर्याद दिली आहे. अशाच प्रकारे नागनाथ पेंटप्पा गुंडला यांच्यासह अन्य २१ जणांचीही सुमारे २४ लाख २६ हजार ६९८ रुपये अशी एकूण २६ लाख ८५ हजार ९७८ रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक सचिन पवार करीत आहेत.
------------------------
योजनेचे आमिष दाखवून १.३३ लाखांची फसवणूक
- आॅईल फॅक्टरी योजनेत वार्षिक ३३ हजार ४०० रुपये गुंतवणूक करा, दरमहा पाच हजार मिळवा असे आमिष दाखवून फसवणूक केल्याबद्दल अतुल सुभाष कुलकर्णी (रा. साई श्रद्धा अपार्टमेंट, सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदला आहे. यातील आरोपीने फिर्यादी सलीम अमीर पठाण (रा. लोकमान्यनगर, सोलापूर) यास वरीलप्रमाणे आमिष दाखवले. सलीम याने विश्वासाने १ लाख ३३ हजार ६०० रुपये गुंतवले. मात्र आरोपीने पैसे स्वत:साठी वापरून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.