लसींची मदत करणाऱ्या सोलापूरचा, लिक्विड ऑक्सिजन टॅंकर अडवून ठेवला पुणेकरांनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 06:33 PM2021-04-23T18:33:39+5:302021-04-23T18:33:45+5:30

अधिकाऱ्यांना फुटला घाम : दोन तहसीलदार चाकणला पाठविल्यानंतर भरलेला टॅंकर जिल्ह्यात

Pune residents intercepted a liquid oxygen tanker from Solapur, which was helping with vaccines | लसींची मदत करणाऱ्या सोलापूरचा, लिक्विड ऑक्सिजन टॅंकर अडवून ठेवला पुणेकरांनी

लसींची मदत करणाऱ्या सोलापूरचा, लिक्विड ऑक्सिजन टॅंकर अडवून ठेवला पुणेकरांनी

Next

सोलापूर : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्ह्यात ऑक्सिजनची आणीबाणी आहे. त्यातच पुण्यातील चाकणमध्ये एअर लिक्वीड घेण्यासाठी गेलेला टँकर पुणे आणि विदर्भातील अधिकाऱ्यांनी बुधवारी रोखून ठेवला होता. त्यामुळे प्रमुख अधिकाऱ्यांनाही घाम फुटला. अखेर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मोहोळ जीवन बनसोडे आणि करमाळ्याचे तहसीलदार समीर माने तहसीलदारांना पाठवून हा टँकर भरायला लावला आणि रुग्णालयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

पाकणी येथील अर्निकेम आणि एमएसपीएल या कंपन्या चाकण येथील एअर लिक्वीड कंपनीकडून लिक्वीड घेतात. या लिक्वीडद्वारे ऑक्सिजन निर्मिती करून सिलिंडरमध्ये भरले जाते. हे सिलिंडर शहरातील रुग्णालयांना पुरविले जाते. या दोन्ही कंपन्यांसाठी सध्या दोन टँकर कार्यरत आहे. हा टँकर बुधवारी दुपारी १२ वाजता चाकणमध्ये दाखल झाला; परंतु सायंकाळी येथील अधिकारी त्याला आतच घेत नव्हते. पुणे आणि विदर्भासाठी ऑक्सिजन अत्यावश्यक आहे. प्रथम त्यांनाच प्राधान्य द्या. सोलापूरची गाडी बाहेर थांबवा असे कळविण्यात आले होते. अर्निकेमच्या प्रमुखांनी बुधवारी सायंकाळी आपली गाडी एअर लिक्वीड कंपनीच्या गेटबाहेर थांबून असल्याचे जिल्हा नियंत्रण कक्षाला कळविले. हा टँकर गुरुवारी दुपारपर्यंत सोलापुरात आला तरच सोलापूरचा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहणार होता. अन्यथा अनर्थ ओढविला असता. या ग्रुपमध्ये सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्वच रुग्णालयातील प्रमुख आहेत. ही सर्व मंडळी हैराण झाली. एका रुग्णालयाने तर ऑक्सिजन न मिळाल्यास आम्ही जबाबदार नाही, असे सांगूनही टाकले.

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी अधिकाऱ्यांना तातडीने पुण्याला पाठविण्याचा निर्णय घेतला. मोहोळ आणि करमाळ्याच्या तहसीलदारांना चाकणमध्ये पाठविले. सोलापूरचा टँकर तातडीने आत घेण्यास सांगितले. गुरुवारी दुपारी हा टँकर भरला आणि तो सोलापूरच्या दिशेने रवाना झाला. रात्री ७.३० वाजण्याच्या सुमाराला चिंचोलीमध्ये सर्व अधिकारी, रुग्णालयांचे प्रमुख या टँकरवर लक्ष ठेवून होते.

सोलापूरला सापत्न वागणूक

शेजारच्या विजापूर, गुलबर्गा, बंगळुरू टोसिलीझुमॅब, रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध आहे. गुजरातमधील काही शहरांमध्ये रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे अनेक लोक कर्नाटक आणि गुजरातमध्ये जाऊन हे इंजेक्शन आणत आहेत. पुण्यातून सोलापूरसाठी रेमडेसिविर, कोरोना लस आवश्यक त्या प्रमाणात मिळत नसल्याचे रुग्णालयांचे म्हणणे आहे.

परवा बळ्ळारीमध्येही अडविला होता टँकर

चिंचोली येथील अर्निकेम, एमएसपीएल, टेंभुर्णी येथील कंपन्यांना नियमित एअर लिक्वीड पुरविणे आवश्यक आहे. या कंपन्या बेल्लारी, चाकण, हैदराबाद येथून लिक्वीड मिळवितात. चिंचोली येथील दोन कंपन्यांकडे एकच टँकर आहे. हा टँकर परवा बळ्ळारी येथील जिंदालच्या प्लांटमध्ये गेला. त्यावेळी नांदेडला टँकर पाठवायचा म्हणून अडवून ठेवण्यात आला होता. सोलापूरची ऑक्सिजन तुटवड्याची अडचण सोडविण्यासाठी या तीन कंपन्यांना वेळेवर लिक्वीड ऑक्सिजन मिळविणे, अश्विनी, मार्कंडेय, गंगामाई अशा मोठ्या रुग्णालयांना त्यांच्या पुरवठादारांकडून वेळेवर लिक्वीड व सिलिंडर मिळणे आवश्यक आहे. अन्यथा मोठी अडचण होणार आहे.

Web Title: Pune residents intercepted a liquid oxygen tanker from Solapur, which was helping with vaccines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.