पुणेरी सोलापूरकर ; सोलापूरची प्रसिद्ध हुग्गी पुण्यात लोकप्रिय...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 11:55 AM2018-09-01T11:55:13+5:302018-09-01T11:56:33+5:30
विविध क्षेत्रांमध्ये दिसतोय सोलापुरी ठसा
रेवणसिद्ध जवळेकर
सोलापूर : पोटाची खळगी भरण्यासाठी सोलापुरातून पुण्यात गेलेल्या मंडळींनी केवळ नोकºयाच नव्हे तर विविध क्षेत्रांमध्ये आपला सोलापुरी ठसा उमटविला आहे. सैन्य दलातील नोकरीनंतर पुण्यात स्थायिक झालेले श्रीकांत हिरेमठ यांची हुग्गी तेथे लोकप्रिय होत आहे. भाग्यवंती उपहारगृहाच्या माध्यमातून ते पुण्यात स्थिरावले आहेत.
सैन्य दलातून निवृत्त झालेले श्रीकांत बसलिंगय्या हिरेमठ हे मूळचे सोलापूरचे. ४-५ वर्षे त्यांनी विमा प्रतिनिधी म्हणून काम पाहिले. त्यानंतर त्यांनी बाळीवेस येथील चौकात हुग्गी सेंटर सुरू केले. काही वर्षेच हा व्यवसाय चालला. पुणेकर मंडळी अस्सल खवय्ये असल्याने हुग्गी व्यवसायाला गती येईल, या अपेक्षेने त्यांनी पुण्यात भाग्यवंती उपहारगृह सुरू केले. जेवणात एक वाटी हुग्गी मिळत असल्याने पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुरुवातीला ३ वर्षे हॉटेलच्या जागेचे भाडे न घेणारे आबा जगताप यांच्यामुळेच आपण पुण्यात स्थिरावल्याचे हिरेमठ सांगतात.
सुनित नितीन मेहता हे तसे मूळचे तुळजापूर तालुक्यातील मंगरूळचे. व्यवसायानिमित्त ते सोलापुरात स्थायिक झाले. सोलापुरात काम करीत असताना तसा प्रतिसाद मिळत नव्हता. चुलते बिपीन मेहता यांच्याकडून बांधकाम व्यवसायाचे धडे घेतलेले सुनित मेहता यांनी ६-७ वर्षांपूर्वी पुणे गाठले. चुलते बिपीन यांची मोलाची साथ मिळाल्याने सुनित यांनी बांधकाम व्यवसायात उडी घेतली. कर्वे नगर भागात राहणाºया सुनितने अस्सल पुणेरी भाषा अवगत केली. आज पुणे, पिंपरी-चिंचवड भागात त्यांचे अनेक गृहप्रकल्प साकारले आहेत. शेवटी जिथे सुरुवात झाली, त्या कर्मभूमीचे ऋण व्यक्त करण्यासाठी सोलापुरात एखादा व्यवसाय सुरू करण्याचा मानस सुनित मेहता यांनी बोलून दाखवला.
सोलापुरात उद्योग सुरू करणार- कलशेट्टी
- सोलापुरातील स्व. इरणप्पा कलशेट्टी यांचा रॉकेलचा गाडा होता. दोन मुले, दोन मुली, पत्नीसह ८ बाय ८ च्या पत्र्याच्या खोलीत ते राहायचे. एम. कॉम.ची पदवी संपादन केलेले त्यांचे चिरंजीव मल्लिनाथ हे नोकरीच्या निमित्ताने १९९० साली पुण्यात गेले. काही कंपन्यांमध्ये उत्तम काम केल्यावर त्यांनी आता अनेक उद्योग सुरू केले आहेत. डेअरी प्रॉडक्ट्स, वाहन उद्योगाला लागणारे साहित्य बनविण्याची फौंड्रीही त्यांनी सुरू केली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडमधील अनेक सेवाभावी संस्थांवर कार्यरत असलेल्या मल्लिनाथ कलशेट्टी यांचा पुण्यात आयकॉन म्हणून गौरव झाला आहे. सोलापुरातील बेरोजगारांना रोजगार मिळावा आणि पुण्याकडे येणारा लोंढा थांबावा, यासाठी सोलापुरात उद्योग सुरू करण्याचा विचार असल्याचे मल्लिनाथ कलशेट्टी यांनी बोलून दाखवला.