पुणेरी सोलापूरकर ; करमाळ्याच्या माजी नगराध्यक्षा पुण्यात बनल्या भाजीपाला विक्रेत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 11:47 AM2018-08-30T11:47:34+5:302018-08-30T11:49:35+5:30
नासीर कबीर
करमाळा : २० वर्षांपूर्वी आरक्षणाचा फायदा झाला अन् सुशीला रामा आगलावे या करमाळ्याच्या नगराध्यक्षा बनल्या. १९९७-९८ या वर्षात भरीव काम केल्यावर त्या पायउतार झाल्या अन् कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्या पुण्यातील तुळजाई झोपडपट्टीत स्थायिक झाल्या. पुणेरीसोलापूरकर बनलेल्या सुशीला आज भाजीपाला विक्रेत्या बनल्या असून, याच व्यवसायाच्या बळावर त्या संसाराचा गाडा हाकत आहेत.
करमाळ्यात असताना घरची परिस्थिती हलाखीची होती. पती करमाळा बसस्थानकावर हमालीचे काम करायचे. शहरातील अण्णाभाऊ साठे नगरात एका पत्र्याच्या घरात पती, पाच मुलांसह त्या राहत होत्या. एक मुलगा लाला पायाने अपंग आहे. अशिक्षित असलेल्या सुशीलाबाई यांना त्यावेळी नगराध्यक्ष म्हणून महिन्याला अवघे ३० रुपये भत्ता मिळत असे. कित्येक वेळा उपाशी राहून त्या नगरपरिषदेच्या सभा, कार्यक्रमांना हजेरी लावत असे.
कितीही वाईट वेळ आली तरी त्यांनी कोणापुढे कधीच हात पसरले नाहीत. नगराध्यक्षपदाची धुरा वाहत असतानाही त्यांनी कुटुंबाच्या पालनपोषणासाठी केळी विकण्याचा व्यवसाय कधीच सोडला नाही. नगराध्यक्ष असताना त्यांनी अपंग मुलास नगरपालिकेत एखादी नोकरी मिळवली असती, पण ते साधे कामही त्या करु शकल्या नाहीत. यावरुन त्यांच्यातील प्रामाणिकपणाचे दर्शन घडल्याशिवाय राहत नाही.
सुशीलाबाई आगलावे यांच्या पतीचे निधन झाले. डोळ्यासमोर अंधारी उभी राहिली. आता काय करायचे ? संसाराचा गाडा कसा हाकायचा ? या विचाराने त्या पुण्यातील तुळजाई झोपडपट्टीत स्थिरावल्या. दहा बाय बाराच्या एका झोपडीत राहून घरातील नऊ सदस्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी सुशीलाबार्इंनी वयाची साठी ओलांडल्यानंतरही डोक्यावर पाटी घेऊन त्या गल्लीबोळातून भाजीपाला विकत आहेत. त्यांचा एक मुलगा हमालीचे काम करतो तर दुसरा अपंग बेरोजगार आहे.
नशिबी घरकूलसुद्धा नाही..
- एकेकाळी करमाळ्याच्या प्रथम नागरिक असलेल्या मागासवर्गीय कुटुंबातील सुशीलाबाई यांना करमाळा शहरात घरकुलसुध्दा मिळालेले नाही.त्यांना वाटते करमाळ्यात आपले हक्क ाचे चांगले घर असावे, त्यांनी करमाळा नगरपरिषदेत घरकुल अनुदानासाठी प्रस्ताव दिलेला आहे, पण त्यांना अनुदान मिळालेले नाही़ त्या अधूनमधून पुण्याहून आशेने येतात, चौकशी करतात व निराश होऊन परत जातात.
पोटाची खळगी भरण्यासाठी पुणे गाठले...
- करमाळा नगरपरिषदेत अपंग उमेदवारांची नोकर भरती होती. त्यावेळी माझ्या मुलास कामाला लावण्यासाठी तब्बल तीन लाख रुपयांची माझ्याकडे मागणी करण्यात आली. नगराध्यक्षपद गेल्यानंतर घरची परिस्थिती ढासळल्याने सुशीलाबार्इंनी रोजगार हमी योजनेत काम करण्यास सुरुवात केली. शेवटी एकवेळचे कुटुंबाचे पोट भरणे मुश्कील झाल्याने करमाळ्यातील घराला कुलूप ठोकून सुशीलाबाई २००७ साली पुण्यात गेल्या.