coronavirus; पुणेरी आयटीयन्स्चे वर्क फ्रॉम सोलापूर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 11:16 AM2020-03-19T11:16:56+5:302020-03-19T11:20:18+5:30
मुलं आली घरी : दिवसभर लॅपटॉपसमोर तरीही पालकांनी व्यक्त केलं समाधान
शीतलकुमार कांबळे
सोलापूर : दिवाळी-दसºयाला घरी येणारा आमचा मुलगा यंदा मार्च महिन्यातच घरी आला आहे. त्याला मनासारखी सुट्टी मिळाली नसली तरी तो आमच्या डोळ्यासमोर असल्याचे समाधान आहे. नेहमी पुणे -मुंबईत काम करणारे मूळचे सोलापूरकर तरुण वर्क फ्रॉम होम या नियमामुळे सोलापुरातील आपल्या घरातून काम करत असताना त्यांच्या पालकांनी अशी प्रतिक्रिया दिली.
कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगचे काम तसे क्लिष्ट असते. त्याला वेळ आणि एकाग्रता लागते. तशा पद्धतीने सॉफ्टवेअर कंपन्यांकडून हे काम करुन घेतले जाते. कोरोनाच्या आजार पसरु नये यासाठी शासनाने वर्क फ्रॉम होमचा आदेश दिला आहे. बहुतांश कंपन्या या आदेशाचे पालन करताना दिसत आहेत. पुण्यातील आपल्या घरातून हे काम करण्यापेक्षा सोलापुरातील आपल्या घरातून काम करणे अधिक आनंददायक होऊ शकते.
घरातील कुटुंबीयांना वेळ देता येईल या उद्देशाने हे आयटीयन्स सोलापुरात आले आहेत. याचा सर्वात जास्त आनंद जर कुणाला होतोय तर तरुण/तरुणीच्या कुटुंबीयांना.सण, उत्सव, वाढदिवस, घरगुती कार्यक्रम या सारख्या कारणाने सोलापुरात येणाºया आयटीयन्सला ही चांगली संधी मिळाली आहे. तसे पाहायला गेले तर पुण्यातील घरात देखील काम करता येऊ शकते. पण पुण्यामध्ये सोलापूरच्या तुलनेने कोरोनाचा प्रसार जास्त झाला आहे. शहरात अद्याप एकही कोरोना आजार असलेला रुग्ण नसल्याने तुलनेने सोलापूर हे सुरक्षित आहे.
फोनवरुन विचारपूस आता बंद
- पुण्यामध्ये कोरोनाचा जास्त परिणाम दिसत आहे. यामुळे सोलापुरातील पालक हे रोज फ ोन करुन आपल्या मुलांच्या आरोग्याची विचारपूस करत आहेत. मास्क लावण्याच्या सल्ल्यापासून रोज हात कधी, किती वेळा आणि कशा पद्धतीने धुवायचे याचा सल्ला देण्यात येत आहे. मात्र, आता पुण्यातील आयटीयन्स हे सोलापुरातूनच काम करत असल्याने विचारपूस करण्याचे आता बंद झाले आहे. आपला मुलगा/मुलगी हे डोळ्यासमोरच असल्याने कोरोनाविषयी चिंता मिटली आहे.
वर्क फ्रॉम होमची संधी आल्यानंतर सोलापुरातील घरातून काम करणे हा चांगला आॅप्शन होता. मी सोलापुरातून काम करु शकतो याची कल्पना आई-बाबांना दिल्यानंतर त्यांना याचा आनंद झाला. सोलापुरात कोरोनाचा आजार नसल्याने येथे यावे असे त्यांनाही वाटले. म्हणून वर्क फ्रॉम होमचा आदेश दिल्यानंतर मी लॅपटॉपसह आपले गरजेचे साहित्य घेऊन सोलापुरातील घर गाठले.
- गणेश कुलकर्णी, सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यापेक्षा सोलापूरचे वातावरण चांगले आहे. येथे कोरोनाची भीती कमी असल्याने सोलापुरातून काम करणे शक्य आहे का असे मुलाला विचारले. त्यानेही होकार दिला. त्याचा दिवसातील बहुतांश वेळ हा कामात जात असला तरी दोनवेळचे जेवण एकत्र होते. सायंकाळी आम्ही सगळे गप्पा मारतो. बाहेर न जाता एकमेकांना वेळ देण्यात जास्त आनंद मिळत आहे.
-गौरी भोसले,
पालक