टेंडरमध्ये अडकली सोलापूर जिल्हा परिषदेची आरोग्य साहित्य खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2020 09:46 AM2020-05-01T09:46:46+5:302020-05-01T09:47:09+5:30
२ कोटी ४ लाख महिन्यापासून अखर्चित; डॉक्टर, आरोग्य सेवक, अंगणवाडी कर्मचारी, आशांना हवे आहेत सुरक्षा किट...!
सोलापूर : जिल्ह्यात 'कोरोना' विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी काम करणाºया डॉक्टर व कर्मचाºयांना सुविधा देण्यासाठी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी एक महिन्यापूर्वी जिल्हा वार्षिक नियोजनमधून दिलेला २ कोटी ४ लाखाचा निधी खर्चाविना पडून असल्याचे दिसून आले आहे.
'कोरोना' साथीसाठी केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा अंमल लागू केला. सर्व यंत्रणांना कोरोना प्रतिबंधासाठी काम करण्यासाठी सूचना दिल्या. जिल्ह्यातील ३५ लाख लोकांचे आरोग्य कोरोनापासून दूर रहावे यासाठी आरोग्य खात्यातील डॉक्टर व कर्मचाºयांना काम करण्याच्या सूचना केल्या. या दरम्यान जिल्ह्यात पुणे, मुंबई व इतर राज्यातून लोक मोठ्या प्रमाणावर आले. त्यामुळे अशा लोकांचे सर्वेक्षण व उपचार करण्यासाठी डॉक्टर व कर्मचाºयांनी वारंवार सुरक्षा साहित्याची मागणी केली, पण जिल्हा आरोग्य कार्यालयातर्फे या साहित्याचा अत्यल्प प्रमाणात पुरवठा करण्यात आला.
जिल्हाधिकारी शंभरकर यांनी ३१ मार्च रोजी कर्मचाºयांना साधने देण्यासाठी २ कोटी ४ लाख ५३ हजार इतका निधी वर्ग केला. पण जिल्हा आरोग्य कार्यालय अद्याप साहित्य खरेदीच्या टेंडर प्रक्रियेतच अडकल्याचे दिसून आले आहे. कोरोना संपून गेल्यावर साहित्य देणार का असा संतप्त सवाल आता झेडपीचे कर्मचारी करीत आहेत. विशेष म्हणजे कोरोनाची साथ पसरून महिना झाला तरी खरेदीसाठी टेंडर प्रक्रिया राबविण्यात येत आहे. आता इतक्या उशिरा पुरवठादार कोण भेटणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
–--------------
अशी आहे आरोग्य यंत्रणा
सिव्हिल हॉस्पीटल, तीन उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय:१४,आरोग्य केंद्र : ७७, उपकेंद्र: ४२७, झेडपी आरोग्य कर्मचारी: १0९0 (मंजूर पदे: १५७२), शल्य चिकित्सक कर्मचारी: २५३ (३१७), राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी: ३२१९ (३२४२), आशा: २७७४ (२७८0), यातील फक्त ४५६२ जणांना कोरोना प्रतिबंधाचे प्रशिक्षण दिले आहे. वरीष्ठ कार्यालयाकडून साधने पुणे आरोग्य उपसंचालकांकडून मास्क: दीड हजार, ट्रिपल लेअर: १0 हजार, हेड्रोक्झी क्लोरोक्वीन गोळ्या: १0 हजार नग. जिल्हा शल्य चिकित्सकांसाठी मास्क: ६ हजार ७५0, पीपीई कीट: ७५ नग, थ्री लेअर मास्क: २0 हजार, गोळ्या ५५ हजार. पण प्रत्यक्षात यातील साहित्य कर्मचाºयांपर्यंत पोहोचले नसल्याच्या तक्रारी आहेत.
----------------
डीपीसीकडून आलेल्या निधीतून साहित्य खरेदीसाठी निविदा मागविली आहे यात मास्क, पीपीई किट, हॅन्डग्लोज, पावडर, ईसीजी मशीन, व्हीटीएम किट मल्टी पॅरा मॉनिटर, पल्स अॅक्सीमीटर टेबल खरेदीची प्रक्रिया सुरू आहे.
- प्रकाश वायचळ,मुख्य कार्यकारी अधिकारी