पुरी शिवारात चालकासह शेतकऱ्याचे हातपाय बांधून ट्रॅक्टर पळविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:22 AM2021-04-25T04:22:11+5:302021-04-25T04:22:11+5:30
कुसळंब : येडशी - कुसळंब राज्यमार्गावर पुरी गावच्या शिवारात साई मंदिराजवळ भगवान अंबऋषी दिडवळ यांच्या शेतात नांगरणी करीत ...
कुसळंब : येडशी - कुसळंब राज्यमार्गावर पुरी गावच्या शिवारात साई मंदिराजवळ भगवान अंबऋषी दिडवळ यांच्या शेतात नांगरणी करीत असताना आठ-दहा चोरट्यांनी शेतकऱ्यांचे हात-पाय बांधले आणि त्यानंतर बेदम मारहाण करीत ट्रॅक्टर व मोबाईल हँडसेटसह ६ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज पळविला.
२३ एप्रिल रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली असून याबाबत जयसिंग मोहन पवार (३२, रा. पुरी) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी १२ तासात या घटनेचा छडा लावत शंकर शिवाजी काळे (२२, रा. तेरखेडा, ता. वाशी, जि. उस्मानाबाद) याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता २८ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
शुक्रवारी रात्री कुसळंब-येडशी राज्य मार्गावर जयसिंग हे शेतात नांगरणीसाठी ट्रॅक्टर (एम. एच. १३, डी. एच. १४१०) घेऊन आले. रात्री एक वाजण्याच्या दरम्यान नांगरत असताना एक ट्रक रोडच्या बाजूला थांबलेला दिसला. २० ते ३० वयोगटातील आठ-दहा जण खाली उतरून आले. दोघांनी ट्रॅक्टरमधून खाली उतरण्यास सांगत काठीने मारहाण केली. ओरडण्याचा आवाज ऐकून शेतमालक भगवान दिडवळ हे धावून आले. चाेरट्यांनी त्यांनाही पकडून मारहाण केली. त्याने जयसिंग आणि भगवान यांचे हात-पाय आणि डोळ्यावर पट्टी बांधून तोंडात बोळे कोंबले. त्यानंतर ट्रॅक्टर, नांगरसह मोबाईल काढून घेऊन चोरटे पसार झाले. जयसिंग यांनी तोंडाला बांधलेली पट्टी मातीच्या ढेकळात घासून काढली आणि भगवान यांना मोकळे केले. त्यांनी अमर पवार, अशोक पवार, प्रवीण दिडवळ यांना फोनवरून घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी त्या दोघांना उपचारासाठी पांगरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल करीत आहेत.
---
संशयिताने गुन्ह्याची कबुली दिली
घटनेनंतर पांगरीचे पोलीस पथक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित धाराशिवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल हे घटनास्थळी दाखल झाले. या घटनेनंतर शिराळा येथे नाकेबंदी केली. पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोज जाधव, कुणाल पाटील, पांडुरंग मुंडे, तानाजी डाके, बोधनवाढ, काकडे, दस हे गस्त घालत असताना शिराळा फाटा येथे शंकर शिवाजी काळे याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.