पौर्णिमा-मयुरी नगरकर पार्टी प्रथम, अकलूज येथे राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचा समारोप !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 02:11 PM2018-01-09T14:11:00+5:302018-01-09T14:14:13+5:30
सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समितीच्या २६व्या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेत पारंपरिक गटात सणसवाडीच्या जय अंबिका लोकनाट्य कला केंद्र्रातील पौर्णिमा-मयुरी नगरकर संगीत पार्टीने प्रथम क्रमांक पटकावला़ आ़ दिलीप सोपल यांच्या हस्ते रोख २५ हजार रुपये व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले़
आॅनलाइन लोकमत सोलापूर
अकलूज दि ९ : सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समितीच्या २६व्या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेत पारंपरिक गटात सणसवाडीच्या जय अंबिका लोकनाट्य कला केंद्र्रातील पौर्णिमा-मयुरी नगरकर संगीत पार्टीने प्रथम क्रमांक पटकावला़ आ़ दिलीप सोपल यांच्या हस्ते रोख २५ हजार रुपये व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले़
शंकरनगर अकलूज येथील स्मृतीभवनच्या बादशाही रंगमंचावर स़ म़ शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समितीच्या वतीने ६ व ७ जानेवारी दरम्यान राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धा पार पडल्या़ बक्षीस वितरण आ़ दिलीप सोपल यांच्या हस्ते व जयंती समारंभ समितीचे संस्थापक जयसिंह मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाले.
यावेळी रंगमंचावर परीक्षक डॉ़ शशिकांत चौधरी, प्राचार्य मधुकरराव गायकवाड, डॉ़ सुवर्णा निंबाळकर, राजश्री नगरकर, सरलाताई नांदुरेकर, पांडुरंग घोटकर, कमलताई जाधव, मीनाताई परभणीकर, रेश्मा परितेकर, वैशाली जाधव-परभणीकर, प्रमिला लोदगेकर यांच्यासह थिएटर मालक व जयंती समारंभ समितीचे सदस्य उपस्थित होते.
आ़ दिलीप सोपल म्हणाले, यावर्षी लावणी स्पर्धेत थोडी खुशी थोडा गम असे वातावरण होते. अनेकांना वाटत होते ही लावणी स्पर्धा अशीच पुढे चालू राहावी. परंतु बाळदादांनी ठाम निर्णय घेतलेला आहे. प्रेक्षक व कलावंतांच्या वतीने जयंती समारंभ समितीला विनंती आहे, ज्या लावणीला अकलूजकरांनी महाराष्ट्रासह देश-विदेशात प्रतिष्ठा मिळवून दिली ती लावणी बंद करू नये. या लावणी स्पर्धेमुळे कलावंतांच्या कलागुणांना वाव मिळतो. अकलूजच्या स्पर्धेत शांतपणे, शिस्तीत लावणी ऐकायला व पाहायला मिळते. हे वातावरण इतरत्र नाही. सहकार महर्षींनी धाडसाने पुढे येऊन प्रसंगी पांढरपेशी समाजाची टीका सहन करून लावणीला राजाश्रय दिला. त्या लावणीचा आता कंटाळा करू नये. थिएटर मालकांनी या स्पर्धेत पार्ट्यांचा सहभाग वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले.
जयसिंह मोहिते-पाटील म्हणाले, लावणी स्पर्धा बंद करण्यामागे कोणतेही अर्थकारण नाही. पूर्वी ज्या संख्येने व उत्साहाने संगीत पार्ट्या सहभागी होत होत्या, तो उत्साह त्या पार्ट्यांमध्ये आता राहिला नाही. लावणीसाठी जी मेहनत घ्यावी लागते ती मेहनत आज कलाकार घेत नाहीत. त्यामुळे एका उंचीवर पोहोचलेली ही लावणी स्पर्धा बंद करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. तरीही थिएटर मालक व कलाकार यांनी साथ दिली तर नक्कीच विचार करू, असे सांगत थिएटर मालक, कलाकार, संयोजन समितीची खा़ विजयसिंह मोहिते-पाटील व आ़ दिलीप सोपल यांच्यासमवेत बैठक घेऊन निर्णय जाहीर केला जाईल़ त्या बैठकीत जर सकारात्मक निर्णय झाला तरच लावणीची सूत्रे पुढच्या पिढीकडे सोपविण्याचा मी विचार करेन, असेही ते म्हणाले.
---------------
अन्य पुरस्कारप्राप्त पार्ट्या, वैयक्तिक बक्षिसे
लावणी नृत्य स्पर्धेतील द्वितीय क्रमांकासह २० हजारांचे पारितोषिक व स्मृतिचिन्ह न्यू अंबिका सांस्कृतिक कला केंद्र ग्रुप पार्टी, यवत-चौफुला जि. पुणे, तृतीय क्रमांक विभागून रू. १५ हजार व स्मृतिचिन्ह बबनबाई मीरा पडसाळीकर, पद्मावती कला केंद्र मोडनिंब व नंदा उमा इस्लामपूरकर नटराज लोकनाट्य कला केंद्र, मोडनिंब यांना देण्यात आला. उत्कृष्ट मुजरा न्यू अंबिका कला केंद्र ग्रुप पार्टी, चौफुला, उत्कृष्ट ढोलकी पल्लवी जाधव (स्वरांजली कला केंद्र, मोडनिंब), उत्कृष्ट पार्श्वगायिका प्राजक्ता महामुनी (शामल सुनीता स्नेहा लखनगावकर, मोडनिंब), उत्कृष्ट पेटीवादक मनोज कुडाळकर (नंदा उमा इस्लामपूरकर, मोडनिंब) व उत्कृष्ट तबलावादक अजय डावाळकर (नटराज लोकनाट्य कला केंद्र, मोडनिंब) यांना देण्यात आले.