वाहन निरीक्षकास धक्काबुक्की, वाहनचालकावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:21 AM2021-03-18T04:21:59+5:302021-03-18T04:21:59+5:30
खताच्या पावडरने ओव्हरलोड भरलेल्या टेम्पोवर कारवाई करण्यासाठी आलेल्या उपप्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक संदीप सुभाष शिंदे यांना ...
खताच्या पावडरने ओव्हरलोड भरलेल्या टेम्पोवर कारवाई करण्यासाठी आलेल्या उपप्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक संदीप सुभाष शिंदे यांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी वाहनचालकाच्या विरोधामध्ये शासकीय कामांमध्ये अडथळा आणल्याचा मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. ही घटना १७ मार्च रोजी चिंचोली औद्योगिक वसाहतीमध्ये घडली.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचोली काटी औद्योगिक वसाहतीमध्ये उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या माध्यमातून कारवाई करण्याचे काम चालू होते, दरम्यान १७ रोजी दुपारी ४ वाजता एमएच ४८ जे ०२५३ हा टेम्पो खत पावडरच्या पोत्यानी ओहरलोड दिसला. तेव्हा प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सरकारी वाहन एमएच ०४ ईपी १३०० यातून पाठलाग करून गाडी थांबवली. चालकाकडे चौकशी केली असता १२ हजार ९९० किलो भार वाहून नेण्याची वाहनांची क्षमता असताना त्या टेम्पोमध्ये १७ हजार ४४० किलो माल आढळून आला. त्यामुळे कारवाई केली. कारवाई करताना वाहनचालक अखिल सत्तार शेख (वय ३४), रा. सैफुल, सोलापूर याने मोटार वाहन निरीक्षक संदीप शिंदे यांना धक्काबुक्की करीत दमदाटी केली. त्यामुळे वाहन चालकाच्या विरोधात शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केल्याची फिर्याद संदीप शिंदे यांनी दिली. त्यानुसार वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार सुनील चवरे हे करीत आहेत.