जंगल मे फायर नहीं फ्लावर होना चाहीए! सोलापुरच्या रानमाळावर 'पुष्पा'; वणवा रोखण्यासाठी जनजागृती
By शीतलकुमार कांबळे | Published: March 5, 2023 04:17 PM2023-03-05T16:17:32+5:302023-03-05T16:21:56+5:30
सोलापूर : उन्हाळा सुरु झाला की अनेक ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडतात. यामुळे झाडांसोबतच वन्यप्राण्यांना जीव गमवावा लागतो. वनव्याचे ...
सोलापूर : उन्हाळा सुरु झाला की अनेक ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडतात. यामुळे झाडांसोबतच वन्यप्राण्यांना जीव गमवावा लागतो. वनव्याचे असे प्रकार घडू नये म्हणून वन विभागाकडून पुष्पाचे फलक लावण्यात आले आहे. यात पुष्पा जंगल मे फायर नहीं फ्लावर होना चाहीए असे सांगतोय.
जंगलांना वणवा लागला तर हवेतील ऑक्सिजनवर परिणाम होतोच; परंतु शेतकरीवर्गासही त्याची झळ मोठ्या प्रमाणावर सोसावी लागते. वणव्यामुळे त्या ठिकाणचे प्राणी सैरभैर होतात. वणन्यामुळे वन क्षेत्राचे नुकसान होते. त्यामुळे वातावरण प्रदूषित होते व संपूर्ण सजीव सृष्टीवर परिणाम होतो. वनसंपदा वणव्यांपासून वाचावी, यासाठी वन विभाग दक्ष झाला आहे. वणवे लावणाऱ्यांवर कठोर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.
..तर दोन वर्षे होऊ शकते जेल
वणवा लावल्यास भारतीय वन अधिनियम १९२७ नुसार २ वर्षे कारावास व ५००० रुपये दंड होतो. वन विभागामार्फत वणव्यांपासून सुरक्षिततेचे उपाय म्हणून वनामध्ये जाळरेषा काढल्या आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीला वणव्यांपासून सुरक्षिततेबाबत सूचित केले जात आहे.
उन्हाळ्यामध्ये जिल्ह्याच्या वनात आगीच्या घटना घडतात. त्या रोखण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून पुष्पा या लोकप्रिय चित्रपटातील डायलॉगचा आधार घेण्यात आला आहे. यासोबतच नागरिकांना एखाद्या ठिकाणी आग लागल्याचे दिसताच ते १९२६ या क्रमांकावर फोन करुन तक्रार देऊ शकतात.
- धैर्यशील पाटील, उपवनसंरक्षक, वन विभाग, सोलापूर