विकासासाठी मतभेद बाजूला ठेवू
By admin | Published: June 15, 2014 12:50 AM2014-06-15T00:50:48+5:302014-06-15T00:50:48+5:30
विजयसिंह मोहिते-पाटील : सोलापूरकरांतर्फे नागरी सत्कार
सोलापूर : शहरात पाणी, वीज, रस्ते, एलबीटी आदी अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न मार्गी लावायचे असेल तर पक्ष अन् सत्तेतील मतभेद विसरुन काम करण्याचे ठरविले तर सर्वच प्रश्न सुटतील, असा विश्वास माढा लोकसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी व्यक्त केला.
सोलापूर शहरातील नागरिकांच्या वतीने शनिवारी सायंकाळी हुतात्मा स्मृती मंदिरालगत असलेल्या मोकळ्या मैदानात आयोजित सत्काराला उत्तर देताना खा. विजयसिंह मोहिते-पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी माढ्याचे आमदार बबनराव शिंदे होते. व्यासपीठावर माजी आमदार राजन पाटील, महादेव पाटील, नरसिंग मेंगजी, महापौर अलका राठोड, माजी महापौर जनार्दन कारमपुरी, मनोहर सपाटे, माजी उपमहापौर विष्णू निकंबे, राजेंद्र कलंत्री, अक्कलकोटचे दिलीप सिद्धे, विजयकुमार हत्तुरे, परिवहन समितीचे सभापती आनंद मुस्तारे, शफी इनामदार, अमोल चव्हाण, प्रा. भोजराज पवार, पद्माकर काळे, देवेंद्र राठोड, चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष सिद्धेश्वर बमणी, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर वनकुद्रे, गोपाळराव कोरे, वैशाली गुंड, सभापती खैरुनबी शेख, सुप्रिया दिलपाक, मंगला कोल्हे, राष्ट्रवादीच्या महिलाध्यक्षा विद्या शिंदे, लता ढेरे आदी उपस्थित होते. मनपातील गटनेते दिलीप कोल्हे आणि कय्युम बुऱ्हाण यांनी या सत्कार सोहळ्याचे नियोजन केले होते.
प्रारंभी नगरसेवक दिलीप कोल्हे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले तर कय्युम बुऱ्हाण यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर माजी आमदार राजन पाटील यांच्या हस्ते खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. मला लोकसभेत जाण्याची इच्छा नव्हती. मात्र शरद पवारांचा आदेश असल्यामुळे माढ्यातून मी निवडणूक लढवली आणि जिंकलीही, असे सांगून विजयसिंह मोहिते-पाटील म्हणाले, माझ्या प्रचारासाठी माढ्याबाहेरील कार्यकर्ते आले होते. या कार्यकर्त्यांचा आणि माढ्यातील मतदारांनी मला विजयी करून मोठे यश मिळवून दिले. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था सुधारली पाहिजे. तेथील आर्थिक उत्पन्न वाढले पाहिजे. तसे चित्र दिसत नसल्याने ग्रामीण भागातील लोकांचा लोंढा शहराकडे येत आहे. सोलापूर शहरही झपाट्याने वाढत चालले आहे. इथली विमानसेवा सुरू झाली आणि दुर्दैवाने बंदही पडली. विमानसेवा सुरू झाल्याशिवाय बाहेरील उद्योजक इथे येणार नाहीत. विमानसेवा सुरू करण्याबाबत आपण नक्कीच पाठपुरावा करू. सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले. यावेळी केतन शहा, राजू सुपाते, राजू राठी, नागनाथ चितकोटी, राजू कुरेशी, किसन जाधव, सुशीला व्हनसाळे, युवराज राठोड, प्रवीण डोंगरे, सुनीता रोटे आदी उपस्थित होते.
------------------------------
कोण काय म्हणाले....
आराखडा द्या- दादा
शहराचा विस्तार वाढत असताना अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मनपाला मिळणारा निधीही अपुरा आहे. त्यासाठी निधी मिळवून देण्याची अपेक्षा महापौर अलका राठोड यांनी व्यक्त केली. त्यावर खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी आपल्या भाषणात ‘तुम्ही आराखडा तयार करून द्या’ असा सल्ला दिला.
----------------------------------
राजन पाटील
कुठलीही लाट आली तरी ती थोपवू शकतात हे माढ्यातून विजयसिंह मोहिते-पाटील यांना विजयी करून मतदारांनी आणि कार्यकर्त्यांनी दाखवून दिले आहे. दादांची तपश्चर्या, समतेचे राजकारण आणि स्व. शंकरराव मोहिते-पाटील यांचे विचार यावरच दादांचा विजय म्हणावा लागेल.
---------------------------------------
आ. बबनराव शिंदे
दादांनी अनेक पदे भोगली. पदावर असताना जिल्ह्यासाठी जे-जे काही करता येईल, ते-ते करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. जिल्ह्यात वीज, पाणी, साखर, इथेनॉल, रस्ते आदी प्रश्न आहेत. याकडे दादांनी लक्ष द्यावे. जिल्ह्यातील सर्वच प्रश्नांची त्यांना जाण आहे. भविष्यात नक्कीच दादा काही तरी करून दाखवतील, असा विश्वास वाटतो.
---------------------------------------
अलका राठोड
शहराच्या विकासासाठी विजयदादांनी मनपाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. केंद्रातून अधिकाधिक निधी कसा आणता येईल याचा विचार दादांनी केला तर शहर विकासाला गती मिळणार आहे.
----------------------------------------
प्रभाकर वनकुद्रे
शहरात एलबीटीचा प्रश्न आहे. एलबीटीमुळे व्यापाऱ्यांना नाहक त्रास होत आहे. एलबीटी रद्द करण्याबाबत दादांनी पुढाकार घेतल्यास व्यापाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. केंद्रातून अनेक योजनाही त्यांना आणता येतील.
-----------------------------------
गटबाजीचा प्रत्यय
खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या नागरी सत्काराच्या निमंत्रण पत्रिकेवर कुठेच राष्ट्रवादी पक्षाचा उल्लेख नव्हता. ‘सोलापूर शहरातील नागरी सत्कार’ असा उल्लेख पत्रिकेवर होता. विशेष म्हणजे शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष महेश गादेकर, उपमहापौर हारून सय्यद आदींना कार्यक्रमाचे साधे निमंत्रणही नव्हते. यावरून दादांच्या सत्कार समारंभात राष्ट्रवादीतील गटबाजीचा पुन्हा प्रत्यय आला.