शेकापचे राज्य सरचिटणीस जयंत पाटील मंगळवारी सांगोला दौऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:15 AM2021-07-12T04:15:27+5:302021-07-12T04:15:27+5:30
शेकापचे ज्येष्ठ नेते भाई गणपतराव देशमुख यांनी सांगोला तालुक्याचे तब्बल ११ वेळा लोकप्रतिनिधीत्व केले आहे. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव ...
शेकापचे ज्येष्ठ नेते भाई गणपतराव देशमुख यांनी सांगोला तालुक्याचे तब्बल ११ वेळा लोकप्रतिनिधीत्व केले आहे. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव व वयोमानानुसार त्यांनी २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवली नाही. त्यांनी त्यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांना उमेदवारी देऊन निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना थोडक्या मताने पराभव पत्करावा लागला. दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून गणपतराव देशमुख यांची वयोमानानुसार प्रकृती खालावत चालली आहे. त्यातच कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे ते स्वतः घराबाहेर पडण्याचे टाळत असल्यामुळे जनतेशी संपर्क तुटला आहे. तरीही शेकापच्या गावागावातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत एकदिलाने काम केल्यामुळे बहुसंख्येने ग्रामपंचायतीवर शेकापने वर्चस्व राखले आहे.
विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर डॉ. अनिकेत देशमुख व डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी वेळ दिला होता. दरम्यान, भाई गणपतराव देशमुख यांचा जनतेशी तुटलेला संपर्क व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी राज्याचे चिटणीस आमदार भाई जयंत पाटील १३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सांगोला दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्यांच्या उपस्थितीत शेकापचे नेते बाळासाहेब एरंडे यांच्या निवासस्थानी जिल्हा बँकेचे संचालक चंद्रकांत देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख व डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व सांगोला नगरपरिषद निवडणुकीसंदर्भात शेकापच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी बैठक होणार आहे.
या बैठकीत गेल्या दोन वर्षांतील पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेतला जाणार असून चर्चा-विचारविनिमय करून निवडणुकीची व्यूहरचना आखणे त्याचबरोबर पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची मध्यवर्ती राज्यस्तरीय बैठक सांगोल्यात घेण्यासंदर्भात चर्चा होणार आहे.