पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह पंढरीत घबराट; खुनाचा तपास लागेना
By admin | Published: May 5, 2014 10:19 PM2014-05-05T22:19:03+5:302014-05-06T17:09:22+5:30
पंढरपूर :
पंढरपूर :
येथील गर्दीच्या ठिकाणी बेणारे रूग्णालयाच्या तळमजल्यावर महिलेची हत्या होऊन दोन दिवस झाले तरी तपास शून्यच असल्याने पोलिसांच्या कारभाराबद्दल पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बेणारे रूग्णालयाच्या तळमजल्यावर हौसाबाई व्यंकटराव माने (वय ७०, रा. श्रीरामनगर, टाकळी रोड, पंढरपूर) यांच्या डोक्यात अज्ञात इसमाने हत्याराने मारून शनिवारी हत्या केली. ही हत्या गर्दीच्या ठिकाणी होऊनही दोन दिवसांनंतरही पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. यामुळे शहरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलेचा खून कोणत्या कारणासाठी झाला, कोणी केला, या एकाही प्रश्नाचे उत्तर पोलिसांच्या हाती लागले नाही. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी जनमानसात शंका उपस्थित केली जात आहे.
मागील काही दिवसांपूर्वी चक्क पोलिसाच्याच घरी चोरी झाली होती. या चोरीमध्ये पोलिसाच्या घरातील सोन्यासह एक लाख रकमेचा ऐवजाची चोरी झाली होती. अशा चोरीच्या घटना पोलिसांच्या घरी होत असतील तर सामान्य नागरिकांची घरे कशी सुरक्षित राहणार, असा प्रश्न पंढरपुरातील नागरिकांना पडला आहे. (प्रतिनिधी)