जिल्ह्याला मिळणारा लिक्विड ऑक्सिजनचा कोटा दहा टनावरून पाच टनावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:23 AM2021-05-06T04:23:00+5:302021-05-06T04:23:00+5:30
टेंभुर्णी : अन्न आणि औषध प्रशासनाने सोलापूर जिल्ह्याला मिळणारा लिक्विड ऑक्सिजनचा कोटा दहा टनावरून पाच टनावर आणला आहे. त्यामुळे ...
टेंभुर्णी : अन्न आणि औषध प्रशासनाने सोलापूर जिल्ह्याला मिळणारा लिक्विड ऑक्सिजनचा कोटा दहा टनावरून पाच टनावर आणला आहे. त्यामुळे टेंभुर्णी येथील ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पावर त्याचा परिणाम झाला आहे. भविष्यात ऑक्सिजनच्या टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची माहिती टेंभुर्णी औद्योगिक वसाहतीमधील ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पाचे संचालक रामभाऊ शिंदे यांनी दिली.
या ऑक्सिजन प्रकल्पामुळे आतापर्यंत जिल्ह्यात असंख्य कोरोना रुग्णांचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे.
सध्या वरील आठ तालुक्यांसाठी जवळपास ११०० ऑक्सिजन गॅस टाक्यांची मागणी आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी दररोज किंवा एक दिवसाआड पाच टन लिक्विड ऑक्सिजन टेंभुर्णी प्रकल्पाला मिळत होता. मात्र आता टेंभुर्णी ऑक्सिजन प्रकल्पाला फक्त २.५ टन लिक्विड ऑक्सिजन मिळणार आहे. तोही दोन दिवसातून एकदा मिळणार आहे. यामुळे हा लिक्विड ऑक्सिजन कोटा कमी करण्याचा एफडीएचा निर्णय जिल्ह्यातील कोविड रुग्णांच्या नातेवाइकांची चिंता वाढविणारा आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने लिक्विड ऑक्सिजन कोटा पूर्वीप्रमाणे प्रतिदिन १० टन करण्यास परवानगी देण्याची गरज आहे. टेंभुर्णी ऑक्सिजन प्रकल्पात चोवीस तासांचे वेटिंग आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना वेटिंग वाढणे निश्चित परवडणारे नाही. तसेच जिल्हा प्रशासनाने ऑक्सिजन प्रकल्पाच्या समस्याही गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
---
अनंत अडचणींवर मात करून ऑक्सिजन प्रकल्प चालू ठेवला आहे. प्रशासनाचे निर्बंध खूप आहेत; पण सहकार्य अजिबात मिळत नाही. ऑक्सिजन विषय अत्यंत संवेदनशील असला तरी राजकीय अनास्थेमुळे सोलापूर जिल्ह्यास हवा तेवढा लिक्विड ऑक्सिजन पुरवठा होत नाही. तो पुरेसा मिळाला नाही तर गंभीर परिणाम भोगावे लागतील. ही जबाबदारी शासनावर राहील.
- राजाभाऊ शिंदे
प्रकल्प संचालक
----
दररोज ६०० सिलिंडर ऑक्सिजननिर्मिती
राज्यात लिक्विड ऑक्सिजन वितरणासाठी शासनाने एफडीए कमिटी गठित केली आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी आयनॉक्स ही कंपनी लिक्विड ऑक्सिजन वितरणाचे काम करीत आहे. ती टेंभुर्णीत असून, सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा ऑक्सिजन प्रोसेस प्रकल्प म्हणून पाहिला जातो. येथे हवेतून ऑक्सिजन वेगळा करून तो व्हेपराईज करून गॅस सिलिंडरमध्ये भरला जातो. प्रतिदिन ६०० सिलिंडर ऑक्सिजननिर्मिती क्षमता असलेल्या या प्रकल्पातून जिल्ह्यात बार्शी, मोहोळ, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, माळशिरस, माढा, करमाळा या आठ तालुक्यात ऑक्सिजन वितरणाचे काम सुरू आहे. राज्यात लिक्विड ऑक्सिजन वितरणासाठी शासनाने एफडीए कमिटी गठित केली आहे.
----
०५ टेंभुर्णी
ऑक्सिजन सिलिंडरसाठी टेंभुर्णी येथील ऑक्सिजननिर्मिती प्रोजेक्ट समोर वाहनांची लागलेली रांग.