अतिवृष्टीनंतर रब्बी हंगाम जोमात सांगोला तालुक्यात ३६ हजार ७३४ हेक्टरवर ज्वारी लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:16 AM2021-01-01T04:16:12+5:302021-01-01T04:16:12+5:30
सांगोला : खरीप हंगामात झालेल्या मुसळधार पावसामुळे सांगोला तालुक्यातील रब्बी हंगाम जोमात आहे. तालुक्यात ३६ हजार ७३४ हेक्टरवर ज्वारी, ...
सांगोला : खरीप हंगामात झालेल्या मुसळधार पावसामुळे सांगोला तालुक्यातील रब्बी हंगाम जोमात आहे. तालुक्यात ३६ हजार ७३४ हेक्टरवर ज्वारी, ४ हजार ७४४ हेक्टरवर मका, १ हजार ५२२ हेक्टरवर गहू, १ हजार ४०३ हेक्टरवर हरभरा पेरणी झाली आहे. ३१६ हेक्टरवर कांद्याची लागवड झाली आहे. चालू वर्षी रब्बी हंगामातील सर्वच पिके जोमात बहरल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार आहे.
यावर्षी अतिवृष्टीने पाण्याचे दुर्भिक्ष कमी केले आहे. तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील ज्वारीसह मका, गहू, हरभरा, तूर या पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. पीक वाढीसाठी यंदा हवामानही अनुकूल आहे. कणसं बाहेर पडू लागल्याने बहरलेल्या पिकात पाखरांचा वावर वाढला आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना पिकांची राखण करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागत आहे. मजुरीचे दर आणि शेतीमालाला बाजारपेठेत अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
हरभरा फुलोऱ्यात
सध्या ज्वारीसह गहू, हरभरा, मका ही पिके बहरल्याने हरभरा फुलोऱ्यात, तर ज्वारी हुरड्यात आली आहे. अशातच गव्हावरही कोवळ्या ओंब्या दिसू लागली आहेत. त्यामुळे विविध पक्षी या पिकांवरील कणसांवर बसून स्वत:ची भूक भागवित आहेत.