अफवांच्या बाजाराला आवर घाला, यदू जोशी यांचे आवाहन, लोकमतचे रवींद्र देशमुख यांचा ‘ल़ गो़ काकडे स्मृती पुरस्कार’ने सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 05:26 PM2018-01-08T17:26:13+5:302018-01-08T17:30:32+5:30
देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेच्या वतीने लोकमतचे उपमुख्य उपसंपादक रवींद्र देशमुख यांना यंदाचा ‘कल्पतरुकार कै़ ल़ गोक़ाकडे स्मृती पुरस्कार’ जोशी यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ८ : समाजात अविचारांचा उच्छाद मांडणाºयांना थोपविणे, चांगल्या प्रवृत्तीला प्रोत्साहन देणे, वाचकांना आवडेल अशा विषयावर लिखाण करणे, सध्याच्या अफवांच्या बाजाराला आवर घालणे, अशी अनेक आव्हाने पत्रकारांसमोर असल्याचे प्रतिपादन राज्य पत्रकार अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदू जोशी यांनी केले़
देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेच्या वतीने लोकमतचे उपमुख्य उपसंपादक रवींद्र देशमुख यांना यंदाचा ‘कल्पतरुकार कै़ ल़ गोक़ाकडे स्मृती पुरस्कार’ जोशी यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते़ हि़ ने़ वाचनालयाच्या अॅम्फी थिएटरमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आकाशवाणीचे सहायक संचालक सुनील शिनखेडे होते़ व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष प्रा़ डॉ़ श्रीकांत येळेगावकर, उपाध्यक्ष हरिभाऊ जतकर, शंकर कुलकर्णी, कोषाध्यक्ष सतीश पाटील, प्रमुख कार्यवाह श्याम जोशी, महिला शाखेच्या अध्यक्षा हेमा चिंचोळकर यांची प्रमुख उपस्थिती होती़ परिचय दत्तात्रय आराध्ये यांनी करुन दिला़ प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष प्रा़ डॉ़ श्रीकांत येळेगावकर यांनी केले़
जोशी पुढे म्हणाले, सोशल मीडियाचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे़ जेव्हा एखाद्या व्यक्तीवर टीका करायची आहे तेव्हा त्याच्या चुका शोधून त्यावर भाष्य करणे क्रमप्राप्त आहे़ चुकांवर पांघरुन घालणारे नसावे़ पूर्वी एखादी घटना घडली की सायंकाळी बातमी टाईप करुन पानावर सोडली जायची़ आता मल्टिमीडियाचा जमाना असून, घटना घडली की अगोदर त्या जागेवर जाऊन माहिती आॅनलाईन सोडावी लागते़ हे बदल पत्रकारांना स्वीकारावेच लागतील़ पत्रकारांना वैविध्यपूर्ण ज्ञान मिळविण्याची भूक असावी़ सत्यतेवर आधारित लिखाणाचे कौशल्य आत्मसात करावे़ व्यक्ती अथवा व्यक्तिद्वेषावर टीका करु नये, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले़
सूत्रसंचालन श्याम जोशी यांनी केले़ आभार गिरीश यांनी मानले़ यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय माने, पंचांगकर्ते मोहन दाते, माजी नगरसेविका मोहिनी पत्की, कवी माधव पवार, सुविद्या प्रकाशनचे बाबुराव मैंदर्गीकर, पाखर संकुलच्या शुभांगी बुवा आदी उपस्थित होते़
------------------
पुरस्काराची रक्कम पाखर संकुलास...
- देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेच्या वतीने पुरस्काराच्या रुपाने दिलेली पाच हजारांची रक्कम रवींद्र देशमुख यांनी पाखर संकुलास दिली़ पाखर संकुलाच्या शुभांगी बुवा यांनी ही रक्कम स्वीकारली़