सोशल मीडियावर बेडशीट गॅंगच्या नावाने खोटे संदेश 'व्हायरल' करणारे पोलिसांच्या रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 11:22 AM2020-11-23T11:22:45+5:302020-11-23T11:24:01+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
मंगळवेढा/मल्लिकार्जुन देशमुखे
बेडशीट व इतर वस्तू विकणाऱ्या पासून सावध रहा हे दरोडेखोर आहेत हे सर्व गावातील ग्रुपवर पाठवा असा मंगळवेढा पोलिस ठाण्याच्या नावाने खोटा व बनावट संदेश तयार करून ते सोशल मीडियावर 'व्हायरल' केला जात आहे याप्रकरणी पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी चौकशी सुरू केली आहे. कोणतीही पोस्ट खातरजमा जमा न करता नागरिकांत भीती निर्माण होईल असे खोटे मेसेज व्हाट्सआप वर पसरवणाऱ्या व्यक्तींचा सायबर गुन्हे शाखेमार्फत शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, गेले काही दिवस सोशल मीडियावर विशेषतः व्हॉट्स अपवर सौजन्य मंगळवेढा पोलीस स्टेशन यांच्या नावाने बोगस संदेश फिरत आहेत. चुकीची माहिती देणारे हे आवाहन करणारे संदेश व्हायरल होत आहेत. बेडशीटसह वस्तू विकणारे दरोडेखोर आहेत अशा चुकीच्या मेसेजमुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण होत आहे.
याबाबत पोलीस निरीक्षक गुंजवटे यांच्याशी 'लोकमत'ने संपर्क साधला असता त्यांनी हा मेसेज चुकीचा आहे.
अशा प्रकारचे कोणतेही आवाहन मंगळवेढा पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले नसल्याची माहिती 'लोकमत' शी बोलताना दिली.
त्यामुळे नागरिकांनी असे बेडशीट विकणाऱ्याबद्दल मंगळवेढा पोलीस ठाण्याच्या नावाने असणारे संदेश, आवाहन कोणतीही खात्री न करता पुढे पाठवू नयेत. माहितीची सत्यता पडताळावी याबाबत पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा. व्हाट्सआप अडमिन नी असे मेसेज पाठवणाऱ्याला समज द्यावी अशा खोट्या अफवा पसरणे, खोटी माहिती पसरवणे हा गुन्हा असून मंगळवेढा पोलीस व सायबर क्राईम पोलीस अशा घटनांवर लक्ष ठेवून आहेत. संबंधितांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येणार आहे.
अफवेने घेतला होता पाच जणांचा जीव
खवे येथील नाथपंथी (डवरी) समाजाचे लोक धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे भिक्षा मागावयास गेल्यानंतर तेथील ग्रामस्थांनी मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून पाच लोकांना ग्रामपंचायतमध्ये कोंडुन बेदम मारहाण केली होती. यामध्ये या पाच लोकांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली होती अशाप्रकारे अशा खोट्या मेसेज निष्पाप लोकांचा हकनाक जीव जाऊ शकतो याचे भान ठेवले पाहिजे. यासाठी गावोगावच्या पोलिस पाटील यांनी मुसाफिरी रजिस्टर मध्ये अनोळखी विक्रेत्यांची मोबाईल नंबर, आधार कार्ड अशी माहिती अद्ययावत ठेवावी. सोने पॉलिश करून देणारे अथवा चेकिंग चालू आहे पोलीस असल्याचे सांगून सोने लाबवणाऱ्यापासून सावध रहा पोलीस अशा प्रकारे कोणालाही सोने देण्याबाबत सांगत नाहीत तरी नागरिकांनी एकाद्या अनोळखी व्यक्ती बदल संशय आल्यास थेट मंगळवेढा पोलिस ठाण्यात संपर्क करावा. पोलीस सर्वोतोपरी तुमच्या मदतीला तयार असल्याचे आवाहन पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी केले आहे.