सोलापूरच्या पोलिसांमुळं एमएच - १३ क्रमांकाची गाडी परराज्यात रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 02:28 PM2019-06-20T14:28:13+5:302019-06-20T14:31:16+5:30
खरंय सोलापूरच्या पोलीसांकडून हायवेवर प्रचंड लूट सुरू असल्याची प्रतिक्रिया
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील एम.एच. १३ क्रमांकाची गाडी परराज्यात दिसली की, सूड भावनेने तेथील वाहतूक शाखेचे पोलीस जाणीवपूर्वक अडवतात. सोलापूरच्या पोलिसांमुळेच एम.एच. १३ रडारवर असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियावरून व्यक्त केली जात आहे.
लोकमतने मंगळवारी शहराबाहेरील नाक्यावर स्टिंग आॅपरेशन करण्यात आले होते. स्टिंग आॅपरेशनबाबत जिल्ह्यातील व बाहेरील लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. खरंय...हायवेवर प्रचंड लूट होते आणि मानसिक ताण पण येतो. नेहमीच हायवेवरून ये-जा करताना हे दृष्टीस पडते. दररोज हजारो रुपये कमावले जातात, पण लक्ष कुणाचं नाही. कदाचित यामुळेच परराज्यात एम.एच.-१३ ही गाडी दिसली की तेथील ट्रॅफिक पोलीस अडवतात. चौकशी करतात, हे सर्व जाणीवपूर्वक केले जातं असा आरोप सोशल मीडियावर लोकांकडून होत आहे.
मुंबई, पुण्यासह आंंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातून येणाºया जाणाºयांची संख्या मोठी आहे. सर्व खासगी वाहनांना सोलापुरातून बायपासमार्गे जावे लागते. नेमके नाक्याच्या ठिकाणी थांबून शहर वाहतूक शाखेचे पोलीस सर्व बाहेरील जिल्ह्यातील व परराज्यातील वाहनांना अडवतात. गरज नसताना त्यांना विविध कागदपत्रांची मागणी करून चुका दाखवतात. शेवटी दंडाची रक्कम भरण्यास सांगून सोडून देतात. सर्रास या प्रकाराचा अनुभव प्रवाशांना सोलापुरातच येतो. प्रवाशांना वेळ नसतो, नसती कटकट नको म्हणून ही मंडळी दंडाची रक्कम भरून निघून जातात; मात्र सोलापुरातील हा अनुभव सोबत नेतात. वाहतूक शाखेच्या या कारवाईमुळे सोलापूर पुरतं बदनाम होत आहे. एकीकडे शहर स्मार्ट होत असताना पोलिसांनीही स्मार्ट होत आपल्या शहराची, जिल्ह्याची प्रतिमा सुधारण्यासाठी पाऊले उचलावीत अशाही भावना सोलापूरकरांमधून उमटत आहेत.
सोलापुरातील पोलीस अती करीत आहेत : प्रवासी
- सोलापुरातील वाहतूक शाखेचे पोलीस अती करीत आहेत, मी दि.१२ जून २0१९ रोजी सकाळी ६ वाजता नांदेड, लातूर, तुळजापूर, सोलापूर असा प्रवास केला. दोन दिवसात मला कोणत्याही वाहतूक शाखेच्या पोलिसांनी अडवले नाही. कागदपत्रांची मागणी केली नाही, त्या शहरात पण ट्रॅफिक पोलीस होते. १३ जून रोजी मी जेव्हा सोलापुरात प्रवेश केला तेव्हा माझी गाडी अडवण्यात आली. गाडीच्या कागदपत्रांची मागणी करण्यात आली, लायसन्स तपासण्यात आले. मला वाटते भारतात गाडी अडवण्यासाठीचे विशेष अधिकार सोलापूर वाहतूक पोलिसांनाच दिले आहेत का काय? असा सवाल राजेश जगताप या प्रवाशाने सोशल मीडियावर केला आहे.