मुळेगावात अवैध हातभट्टी दारु निर्मितीवर छापा; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त
By Appasaheb.patil | Published: September 28, 2022 08:02 PM2022-09-28T20:02:43+5:302022-09-28T20:02:51+5:30
सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभाग महाराष्ट्र राज्य चे आयुक्त कांतीलाल उमाप, विभागीय उपायुक्त पुणे अनिल चासकर यांचे आदेशान्वये व अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली व उपअधीक्षक आदित्य पवार यांचे नेतृत्वात मुळेगाव तांडा ता. दक्षिण सोलापूर परिसरात अवैध हातभट्टी दारु निर्मिती व साठा ठिकांणावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने 28 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास धाडी रु. 3.50 लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सविस्तर वृत्त असे की, २८ सप्टेंबर रोजी रोजी उपअधीक्षक आदित्य पवार यांचे नेतृत्वात सामुहिक मोहिमेचे आयोजन करुन मुळेगाव तांडा ता. दक्षिण सोलापूर येथिल चिंतामणी नगर व भानुदास तांडा येथिल काही घरांमध्ये व तांड्यालगतच्या परिसरामध्ये गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीच्या आधारे अचानक छापे मारुन सदर ठिकाणी १० वारस गुन्हे नोंद करुन फ़रार आरोपींविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
या कारवाईत १२ हजार ९४० लिटर गुळमिश्रीत रसायन, १ हजार लिटर हातभट्टी दारु, १२० किलो गुळपावडर, प्लॅस्टिक घागरी, रिकामे रबरी ट्युब, ईलेक्ट्रिक मोटार असा एकूण ३ लाख ५० हजार ४०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन नाश करण्यात आला आहे. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, कर्मचारी कारवाईसाठी गेले असता गुन्ह्याच्या ठिकाणांहुन आरोपी पळुन जावुन फ़रार झालेले आहेत, त्यांचा शोध सुरु आहे.
सदरची कारवाई उपअधीक्षक आदित्य पवार, निरीक्षक संभाजी फ़डतरे, सदानंद मस्करे, गुलाब जाधव, पवन मुळे, संदिप कदम व सर्व दुय्यम निरीक्षक व जवान स्टाफ़ यांनी पार पाडली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विशेष पथके नेमण्यात आली असून अवैध दारु विक्री, निर्मिती, वाहतुकीवर सातत्याने कारवाया केल्या जात आहेत. तसेच सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारु निर्मिती / वाहतूक / विक्री/ साठा, बनावट दारु, परराज्यातील दारु याबाबत माहिती मिळाल्यास या विभागास संपर्क साधावा.