सोलापुरातील शहाळे विक्रेते, दुकाने अन् मंगल कार्यालयांवर आजपासून धाडसत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2022 12:55 PM2022-07-04T12:55:17+5:302022-07-04T12:55:20+5:30
प्लास्टिक बंदी : महापालिकेचे आराेग्य निरीक्षक करणार दंडात्मक कारवाई
साेलापूर : केंद्र सरकारने एकल प्लास्टिकच्या वापरावर १ जुलैपासून बंदी घातली आहे. या नियमाचे उल्लंघन हाेऊ नये यासाठी महापालिका साेमवारपासून शहाळे विक्रेते, किराणा दुकाने, मंगल कार्यालयांची तपासणी करणार आहे. प्लास्टिक आढळल्यास पाच हजार ते २५ हजार रुपयांचा दंड हाेणार आहे.
प्लास्टिक कॅरिबॅगच्या वापरास बंदी हाेती. पालिकेचे पथक कॅरिबॅग वापरणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करीत हाेते. आता प्लास्टिकपासून बनविलेल्या अनेक वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. पालिकेचे आराेग्य निरीक्षक व कर्मचाऱ्यांचे पथक १ ते ८ विभागीय कार्यालयांच्या अंतर्गत येणाऱ्या आस्थापनांची तपासणी करणार आहे. या कारवाईत दुकानदारांवर गुन्हे दाखल हाेऊ शकतात, असा इशारा मुख्य आराेग्य निरीक्षक नागनाथ बिराजदार यांनी दिला आहे.
--
या वस्तूंवर असेल बंदी
प्लास्टिक कॅरिबॅग, प्लास्टिक स्टीक असणारे ईअर बर्डस्, फुग्यांसाठी वापरली जाणारी प्लास्टिक, प्लास्टिकचे झेंडे, स्ट्राॅ, थर्माकाॅल, प्लास्टिकच्या प्लेट, प्लास्टिकचे कप, प्लास्टिकचे ग्लास, चमचे, ट्रे, मिठाईच्या डब्यांना लागणारा प्लास्टिकचा कागद, सिगारेटचे पाकीट, दुकानात साखर व इतर वस्तूंसाठी वापरल्या जाणाऱ्या बॅग.
---
असा वसूल हाेईल दंड
पहिल्या कारवाईत ५ हजार रुपये, त्याच दुकानात दुसऱ्यांदा प्लास्टिक आढळल्यास १० हजार रुपये, तिसऱ्यांदा प्लास्टिक आढळल्यास २५ हजार रुपये दंड आणि पाेलिसांत गुन्हा दाखल हाेणार आहे.
--
शहाळे विक्रेते अडचणीत
शहाळे विक्रेते शहाळासाेबत प्लास्टिकचा स्ट्राॅ देतात. प्लास्टिक बंदीमुळे कागदाचा स्ट्राॅ तयार करण्यात आला; पण शहरातील अनेक विक्रेत्यांकडे पाेहाेचलेला नाही. त्यामुळे शहाळे विक्री करायचे की नाही याची चिंता असल्याचे शहाळे पुरवठादार माेहसीन शेख यांनी सांगितले.
--
पालिकेने एका महिन्यात वसूल केले साडेतीन लाख
महापालिकेने जून महिन्यात कॅरिबॅग वापरणारे ७१ भाजी विक्रेते, फळ विक्रेते यांच्यावर कारवाई केली. यातून तीन लाख ५५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. ४१७ किलाे कॅरिबॅग जप्त केल्या.
--
केवळ गाेरगरिबांवर कारवाई
महापालिका केवळ गाेरगरीब भाजी विक्रेते, फळ विक्रेते यांच्यावर कारवाई करीत आहे. मिठाईची दुकाने, माॅल, मंगल कार्यालयात प्लास्टिकचा वापर हाेताे. पालिकेचे अधिकारी या ठिकाणी फिरकत नाहीत. या आस्थापनांवर कारवाई झाली तरच खऱ्या अर्थाने कारवाई झाली असे म्हणता येईल.
- श्याम कदम, संभाजी ब्रिगेड