सर्वसामान्यांचा रेल्वे प्रवास महागच; गाडीचा क्लास पॅसेंजर; तिकीट मात्र एक्स्प्रेसचं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2022 06:09 PM2022-06-01T18:09:53+5:302022-06-01T18:09:57+5:30
रेल्वे प्रशासनाचा कारभार : सर्वसामान्यांची आर्थिक कोंडी
साेलापूर - कोरोनानंतर रेल्वेची प्रवासी सेवा रुळावर आली असून, सर्व गाड्या नियमित अन् वेळेवर धावत आहेत; मात्र पॅसेंजर गाड्यांमधून प्रवास करताना एक्स्प्रेस गाडी भाड्याच्या पटीत तिकीट काढावे लागत असल्याने सर्वसामान्यांचा प्रवास महागल्याचे दिसून येत आहे. पॅसेंजर गाड्यांचे तिकीट दर पूर्वीप्रमाणे कमी करावेत अशी मागणी आता प्रवासी वर्गातून होत आहे.
कोरोनानंतर परिस्थिती पूर्वपदावर येऊन आता सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक सुद्धा पूर्वपदावर येऊ लागले आहे, तर प्रवाशांच्या वाढत्या संख्येनुसार एक्स्प्रेस, पॅसेंजर, डेमू गाड्यांची संख्या देखील वाढविण्यात आली आहे; मात्र पॅसेंजर गाड्यांना लावलेले एक्स्प्रेसचे तिकिटाचे दर अद्यापही कमी केले नसल्याने गाेरगरीब आणि सामान्य नागरिकांना त्याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
-----------
विशेष दर्जा काढला पण...
पॅसेंजर, डेमू, एक्स्प्रेस गाड्यांच्या तिकीट दरात बराच फरक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर एक्स्प्रेस, पॅसेंजर गाड्यांना दिलेला विशेष दर्जा काढण्याचे परिपत्रक काढले; मात्र यानंतरही पॅसेंजर आणि डेमू गाड्यांच्या तिकीटदरात कपात करण्यात आली नाही. पॅसेंजर गाड्यांच्या तिकिटाचे दर पूर्ववत केलेले नाहीत. तिकिटाच्या अधिकच्या दरामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
----------
जनरल तिकीट विक्री बंदच...
रेल्वे बोर्डाने दोन महिन्यांपूर्वी रेल्वे स्थानकावरून जनरल तिकीट विक्री सुरू करण्याचे परिपत्रक काढले; मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. तर रेल्वे गाड्यांना सुद्धा जनरल डबे जोडलेले नाहीत. गोरगरीब प्रवाशांना त्याचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
----------
सध्या सुरू असलेल्या पॅसेंजर गाड्या
- - सोलापूर-पुणे डेमू
- - दौंड-रायचूर पॅसेंजर
- - बारामती-पुणे पॅसेंजर
- - सोलापूर-हैद्राबाद पॅसेंजर
- - सोलापूर-विजयपूर पॅसेंजर
- - लातूर-मिरज डेमू
- - कुर्डूवाडी-मिरज पॅसेंजर
- - सोलापूर-धारवाड पॅसेंजर
----------
तिकिटाच्या दरात वाढच वाढ...
कोरोनानंतर रेल्वे भाडे कमी झालेले नाही. कमी भाडे, जलद प्रवास अन् सुरक्षित प्रवास म्हणून रेल्वेनं सर्वाधिक लोक प्रवास करतात; मात्र रेल्वेकडून प्रवाशांची तिकीट भाड्यातून आर्थिक लूट तशीच सुरू आहे. उदा. सोलापूर ते कल्याण या मार्गासाठी पूर्वी एक्स्प्रेस गाड्यांसाठी १३५ रुपये तिकीट होते; मात्र आता सध्या सोलापूर ते कल्याणसाठी रेल्वेकडून २१९ रुपये आकारले जातात.
-----------
वेटिंगचे प्रमाण वाढले
उन्हाळी सुट्ट्यांमुळे लोक मोठ्या प्रमाणात प्रवास करीत आहेत. पर्यटन, धार्मिक स्थळांना भेटी देण्याबरोबरच दोन वर्षे घरातच बसून राहिलेले लोक आता कुठे बाहेर पडू लागले आहेत. सध्या सोलापूर विभागातून धावणाऱ्या एक्स्प्रेस, मेल गाड्यांचे वेटिंग दिवसेंदिवस वाढतच आहे. सोलापूर-मुंबई, हैद्राबाद मार्गावरील सर्वच गाड्यांचे तिकीट वेटिंगच दाखवित आहे.
-------