कोजागरीतून रेल्वे खात्याला मिळाले दोन दिवसात ३४ लाखांचे उत्पन्न
By appasaheb.patil | Published: October 17, 2019 12:31 PM2019-10-17T12:31:44+5:302019-10-17T12:33:53+5:30
मध्य रेल्वे : मागील वर्षीपेक्षा यंदाच्या उत्पन्नात २़९८ टक्के वाढ
सोलापूर : कोजागरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेश यासह अन्य राज्यांतील भाविकांनी गर्दी केली होती. १३ व १४ आॅक्टोबर रोजी ५७ हजार २९६ प्रवाशांनी रेल्वेने प्रवास केला. यातून मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागास ३३ लाख ७४ हजार १७५ रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीचा जागर झाल्यानंतर लाखो भाविक कोजागरी पौर्णिमेला तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी पायी जातात. देवीच्या दर्शनानंतर भाविक आपापल्या गावी परत जाण्यासाठी रेल्वेचा आधार घेतात. यात कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेशातील बहुतांश भाविकांचा समावेश असतो. दरवर्षीप्रमाणेच यंदाही होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने विशेष अनारक्षित सोलापूर-वाडी या गाडीचे नियोजन केले होते.
त्यामुळे प्रवाशांची सोय झाली़ १३ व १४ आॅक्टोबर रोजी ५७ हजार २९६ प्रवाशांनी रेल्वेने प्रवास करून रेल्वेला ३३ लाख ७४ हजार १७५ रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले़ गेल्या वर्षी २४ व २५ आॅक्टोबर रोजी ३३ लाख ४ हजार ६८६ रुपयांचे उत्पन्न मिळाले होते़ मागील वर्षीच्या तुलनेत यंदा रेल्वेच्या उत्पन्नात २़९८ टक्के वाढ झाल्याचीही माहिती प्रदीप हिरडे यांनी दिली़ सोलापूर-वाडीदरम्यान विशेष गाडीची सोय केल्याबद्दल प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.
आरपीएफ पोलिसांची विशेष सेवा...
- तुळजापूरला दर्शनासाठी येणाºया भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून रेल्वे पोलीस बलाचे प्रमुख मिथुन सोनी यांच्या नेतृत्वाखाली आरपीएफने जादा पोलिसांचा बंदोबस्त ठेवला होता़ याशिवाय चोरीच्या घटना घडू नयेत, यासाठी रेल्वेत पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता़ त्यामुळे भाविकांना सुरक्षित प्रवास करता आल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले़