दिवाळीत रेल्वे हाऊसफुल्ल; तिकिटाचे वेटिंग पोहोचले ३०० वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2021 07:03 PM2021-11-02T19:03:01+5:302021-11-02T19:03:07+5:30
दिवाळीत रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल- तत्काळ तिकीट काढण्यासाठी चढाओढ
सोलापूर - दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेगाड्यांना मोठ्या प्रमाणावर गर्दी असून पुण्या-मुंबईहून सोलापूरकडे येणाऱ्या सर्वच विशेष एक्सप्रेस रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांसाठी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे प्रवाशांना तत्काळ तिकिटाचा आधार घ्यावा लागत आहे. सर्वच रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी असून, अनेक गाड्यांची प्रतीक्षा यादी ही १५० पेक्षाही जास्त झाली आहे.
दिवाळी असल्यामुळे बाहेरगावी असलेली अनेक कुटुंबे आपल्या गावी येत असतात. त्यामुळे त्यांनी सुमारे तीन महिन्यांपूर्वीच रेल्वे गाड्यांच्या प्रवासाचे आरक्षण करून ठेवले होते. २० ऑक्टोबरपासून रेल्वे गाड्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. अनेक प्रवासी आता आरक्षण तिकिटे काढण्यास स्थानकावरील तिकीट खिडकीवर जाऊन चौकशी करताना त्यांना १५० पेक्षा अधिक वेटिंग असलेली तिकिटे मिळत आहेत. दिवाळीच्या दिवसांत रेल्वे गाड्यांना मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याने प्रवाशांना जागा मिळत नाही, त्यामुळे रेल्वेतर्फे दिवाळीच्या काळात विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन प्रशासनाकडून केले आहे.
----------
मुंबई-पुण्याकडून येणाऱ्या गाड्यांना जास्त गर्दी
मुंबई व पुण्याकडून येणाऱ्या रेल्वेगाड्यांना सर्वाधिक गर्दी आहे. सिद्धेश्वर, हुतात्मा, विशाखापट्टम, भुवनेश्वर, गदग, हैद्राबाद, कर्नाटक आदी एक्सप्रेस गाड्यांना हाऊसफुल्ल गर्दी आहे. मराठवाड्यातून येणाऱ्या गाडीतही दिवाळीच्या दिवसांमध्ये जागा उपलब्ध नाही. त्यामुळे प्रवाशांना खासगी बसगाड्यांमधून प्रवास करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.
--------
ट्रॅव्हल्सचीही मोठी भाडेवाढ...
रेल्वेतर्फे सुरू करण्यात आलेल्या विशेष गाड्यांच्या तिकीट दरात नियमितच्या गाड्यांपेक्षा दर जास्त असल्याने रेल्वेच्या प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे शिवाय अनेक प्रवासी खासगी बस, खासगी गाड्यांचाही आधार घेत आहेत. ट्रॅव्हल्स चालकांनीही तिकीट दरात पाच ते दहापट वाढ केल्याचे सांगण्यात आले.
-------
रेल्वे तिकिटाचा काळाबाजार...
रेल्वे तिकीट कन्फर्म मिळत नसल्याने प्रवाशांनी आता रेल्वेच्या तिकीट एजंटांकडे मोर्चा वळविला आहे. तिकिटापेक्षा २०० ते ३०० रुपये जास्त देऊन कन्फर्म तिकीट मिळविण्यासाठी प्रवाशांची धडपड सुरू आहे.. शहरातील तिकीट एजंटांकडे प्रवासी जात असल्याचेही एकाने सांगितले.