पॅसेंजर गाड्या बंद असल्यामुळे सोलापुरातील रेल्वे प्रवाशांची होतेय गैरसोय
By appasaheb.patil | Published: December 25, 2020 12:25 PM2020-12-25T12:25:40+5:302020-12-25T12:25:46+5:30
केवळ विशेष गाड्या सुरू : सर्वसामान्यांची होरपळ
आप्पासाहेब पाटील
सोलापूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या केवळ विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. पॅसेंजर गाड्या बंद असल्याने गरीब रेल्वे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. रेल्वे गाड्या बंद असल्याने सोलापुरातील प्रवासी आता एसटीचा आधार घेत आहेत.
कोरोनाकाळात प्रवासी सेवा बंद केली, अनलॉकनंतर हळूहळू रेल्वेची प्रवासी सेवा रुळावर येत आहे. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या नियमांचे पालन करून काही विशेष गाड्या सुरू केल्या मात्र त्याचा म्हणावा तसा फायदा सोलापूरकरांना होत नाही. कारण बंगळुरु, हैदराबादहून येणाऱ्या सर्वच गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने सोलापूर शहर व जिल्ह्यातील प्रवाशांचे तिकीट वेटींगवरच असल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाची परिस्थिती सुधारली असून सोलापूरकरांच्या हक्काची हुतात्मा, इंटरसिटी व अन्य पॅसेंजर गाड्या त्वरित सुरू करण्याची मागणी लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटनांकडून होत आहे.
सिद्धेश्वर व हसन एक्सप्रेस गाड्या सुरू
सध्या सोलापूर रेल्वे स्थानकावरून सिद्धेश्वर व हसन एक्सप्रेस या दोन गाड्या धावतात. याशिवाय विभागातून उद्यान, कोणार्क, नागरकोईल याशिवाय अन्य एक्सप्रेस गाड्या धावत आहेत. मात्र सोलापूरकरांच्या हक्काची हुतात्मा एक्सप्रेस अद्याप सुरू झाली नाही.
------------
गरीब प्रवाशांची होतेय फरफट
सोलापूरहून पुण्या-मुंबईला नोकरी व शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. याशिवाय लग्नसमारंभ, पर्यटन व इतर कार्यक्रमासाठी बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या वाढत असताना बंद पॅसेंजर व एक्सप्रेस गाड्यांमुळे सोलापूरकरांची मोठी निराशा होत आहे. परिणामी एसटी व खासगी वाहनांचा सोलापूरकरांना आधार घ्यावा लागत आहे.
--------------
२० पॅसेंजर गाड्या बंद
सोलापूर विभागातून सध्या सोलापूर-धारवाड व हुबळी-सोलापूर या दोनच पॅसेंजर धावत आहेत. अन्य पॅसेंजर गाड्या सुरू करण्याचे अधिकार रेल्वे मंत्रालयाने दिले असले तरी विभागीय पातळीवरून याबाबतचा निर्णय घेण्यास विलंब होत आहे.
सध्या धावत असलेल्या गाड्यांपैकी फक्त दोनच गाड्या सोलापूरकरांसाठी फायदेशीर आहेत. हुतात्मा, इंटरसिटी व अन्य गाड्या त्वरित सुरू केल्यास प्रवाशांना दिलासा मिळेल.
- राजेंद्र कांबळे, प्रवासी संघटना