महिलांच्या सुरक्षेसाठी आरपीएफने आणला रेल्वे सुरक्षा अॅप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 04:48 PM2018-05-08T16:48:42+5:302018-05-08T16:48:42+5:30
सोलापूर : रेल्वे प्रवासात महिलांच्या सुरक्षेसाठी आरपीएफने १० महिलांची एक तुकडी आणली आहे़ तसेच सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने एक अॅपदेखील विकसित केल्याची माहिती आरपीएफ सुरक्षा आयुक्त जयण्णा कृपाकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली़
या योजनेच्या माध्यमातून महिला आणि मुलांच्या सुरक्षिततेवर अधिक भर देण्यात आला आहे़ प्रवासादरम्यान महिलांना काही अडचणी आल्यास त्यांनी आरपीएफ जवानांशी संवाद साधून आपली समस्या सांगावी़, अशी संकल्पना आहे. सोलापूर रेल्वे स्थानकात प्रथमच महिला आरपीएफ १० जणींची एक तुकडी नियुक्त करण्यात आली आहे़
दररोज प्रवास करणाºया महिला प्रवाशांसाठी स्पेशल व्हॉट्सअॅप ग्रुपदेखील आरपीएफने बनविला आहे़ तसेच घरातून निघून गेलेल्या आणि हरवलेल्या मुलांसाठी ‘मुस्कान’ ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे़ या मोहिमेच्या माध्यमातून मागील काही दिवसांत ३० मुलांना त्यांच्या पालकांच्या हवाली करता आले आहे़ सात दिवस आणि चोवीस तास हेल्पलाईनच्या मदतीला उपलब्ध असणार आहेत़ या पत्रकार परिषदेस निरीक्षक राकेश कुमार, पवन जयस्वाल उपस्थित होते़
अॅपची घ्या मदत ......
मध्य रेल्वेच्या वतीने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे सुरक्षा अॅपची निर्मिती करण्यात आली आहे़ यामध्ये एक पॅनीक बटन देण्यात आले आहे़ अडचणीच्या वेळी हे बटन दाबल्यास जवळच्या रेल्वे पोलिसांना आणि आपल्या नातेवाईकाला आपण अडचणीत असल्याची माहिती मिळते़ यानंतर जरी मोबाईल बंद झाला तरी ट्रॅकरवरून आरपीएफ जवान मदत करू शकतील़
महिलांसाठी आरक्षित असलेल्या डब्यातून प्रवास करणाºया ५७६ जणांवर कारवाई क रून त्यांच्याकडून लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे़ तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी आता विशेष खबरदारी घेण्यात आली आहे़
- जयण्णा कृपाकर
सुरक्षा आयुक्त, आरपीएफ