सोलापूर जिल्ह्यात विजेवर रेल्वे धावली; भिगवण ते वाशिंबे विद्युतीकरण झाले पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 12:37 PM2020-07-29T12:37:48+5:302020-07-29T12:39:54+5:30
सर्वच चाचण्या यशस्वी : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात दुहेरीकरण, विद्युतीकरणाच्या कामाने घेतली गती
सोलापूर : मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातून पुणे, मुंबईकडे जाणाºया रेल्वे मार्गावरील भिगवण ते वाशिंबे रेल्वे स्टेशनदरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. सोमवारी त्या मार्गावर रेल्वे इंजिनद्वारे चाचणी घेण्यात आली अन् ती यशस्वी झाली.
सोलापूर-पुणे रेल्वे मार्गावर रेल्वेचे विद्युतीकरण काम वेगाने सुरू आहे़ त्या अंतर्गत भिगवण (जि़ पुणे) ते वाशिंगे (ता. करमाळा, जि़ सोलापूर) दरम्यानच्या रेल्वेमार्गावर जिंती, पारेवाडी, वाशिंबे असा एकूण ३५ किलोमीटरचे अंतर आहे़ या ३५ किलोमीटरच्या अंतरावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून, प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेली चाचणी यशस्वी झाल्याचे रेल्वेच्या अधिकाºयांनी सांगितले़ भिगवण ते भाळवणीपर्यंत दुहेरीकरणाचे काम वेगाने पूर्ण करण्यात आले़ त्यानंतर याच मार्गावरील भिगवण ते वाशिंबेपर्यंतचे विद्युतीकरण काम पूर्ण झाले आहे़ दरम्यान, वाशिंबे ते भाळवणीपर्यंत होणाºया विद्युतीकरणाच्या कामाने गती घेतली आहे.
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात सुरू असलेले दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामाने लॉकडाऊनच्या काळात गती घेतली आहे़ प्रवासी रेल्वे बंद असल्याने या कामावर फारसा परिणाम जाणवत नसल्याने दिवस-रात्र हे काम सुरू असून लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यासाठी रेल विकास निगमचे अधिकारी, कर्मचारी कार्यरत असल्याचे सांगण्यात आले.
अंतिम चाचणीनंतरच धावणार रेल्वे...
भिगवण ते वाशिंबे या ३५ किलोमीटर अंतरावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले़ त्यानंतर संबंधित रेल विकास निगमच्या विद्युत विभागाच्या वतीने चाचणी घेतली़ या चाचणीत कोणताही दोष आढळून आला नाही, ती यशस्वी झाली़ आता विद्युतीकरण चाचणी कमिशनर, चीफ कमिशनर आॅफ रेल्वे सेफ्टी यांच्याकडून अंतिम चाचणी झाल्यानंतरच या मार्गावरून रेल्वे धावणार असल्याचेही रेल्वेच्या अधिकाºयांनी सांगितले.