शेतीमाल, फळांच्या वाहतुकीवर रेल्वेने ५० टक्के अनुदान द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:21 AM2020-12-22T04:21:27+5:302020-12-22T04:21:27+5:30
सांगोला : किसान रेल्वेच्या माध्यमातून सर्वच शेतीमाल व फळांच्या वाहतुकीवर ५० टक्के अनुदान मिळावे, यासह रेल्वे स्टेशन आवारातील ...
सांगोला : किसान रेल्वेच्या माध्यमातून सर्वच शेतीमाल व फळांच्या वाहतुकीवर ५० टक्के अनुदान मिळावे, यासह रेल्वे स्टेशन आवारातील श्री जोतिबा देवस्थान मंदिरास रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशा विविध मागण्या भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी रेल्वेचे महाप्रबंधक संजीव मित्तल यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्या. रेल्वेचे महाप्रबंधक संजीव मित्तल हे १८ डिसेंबर रोजी सोलापूर दौऱ्यावर आले असता, सांगोला रेल्वे स्टेशनला भेट दिली. याप्रसंगी चेतनसिह यांनी महाप्रबंधक मित्तल यांची भेट घेऊन मागण्यांसंदर्भात चर्चा केली. किसान रेल्वेच्या माध्यमातून डाळिंब, बोर, आंबा, केळी, पेरू, पपई, मोसंबी, संत्रा, लिंबू, अननस, डाळिंब, सफरचंद, फणस, बदाम, आवळा, चवळी, कारली, वांगी, काकडी, गाजर, फुलकोबी, मिरची, बटाटा, टोमॅटो, कांदा, आले, भेंडी, वाटाणे, लसूण, कांदा, बटाटा या शेतमालाच्या वाहतूक खर्चावर केंद्र सरकारच्या अन्न प्रक्रिया मंत्रालयाने ५० टक्के अनुदान द्यावे. त्याचबरोबर रेल्वे स्टेशनच्या आवारात ७० वर्षांपासून जोतिबाचे मंदिर आहे. मंदिराशेजारी रेल्वेच्या संरक्षण भिंतीचे काम चालू आहे. भाविकांना दर्शनास मंदिरात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे महाप्रबंधक संजीव मित्तल यांच्याकडे केली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, झेडपी सदस्य अतुल पवार, ॲड. गजानन भाकरे, शिवाजी गायकवाड, सांगोला तालुका डाळिंब आडत असोसिएशन अध्यक्ष अनिल केदार, माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार, शहराध्यक्ष आनंद फाटे, डॉ.जयंत केदार, अनिल विभूते, सूर्याजी खटकाळे, प्रवीण चौगुले, प्रवीण जानकर, विशाल कुलकर्णी, मयुरेश गुरव उपस्थित होते.
---
फोटो : २१ सांगोला २
मध्य रेल्वेचे महाप्रबंधक संजीव मित्तल यांना मागण्यांचे निवेदन देताना भाजपाचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत आणि जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख.