जिल्ह्यात सर्वदूर पाऊस, उजनीच्या पाणीसाठ्यात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:27 AM2021-09-07T04:27:53+5:302021-09-07T04:27:53+5:30

भीमानगर : जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडत आहे. दुसरीकडे गेल्या महिनाभरापासून पुण्याकडे पावसाने पाठ फिरविल्याने उजनीच्या पाणीसाठ्यात घट झाली आहे. ...

Rain all over the district, decrease in Ujjain water supply | जिल्ह्यात सर्वदूर पाऊस, उजनीच्या पाणीसाठ्यात घट

जिल्ह्यात सर्वदूर पाऊस, उजनीच्या पाणीसाठ्यात घट

Next

भीमानगर : जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडत आहे. दुसरीकडे गेल्या महिनाभरापासून पुण्याकडे पावसाने पाठ फिरविल्याने उजनीच्या पाणीसाठ्यात घट झाली आहे. मागील आठवड्यात ६२ टक्क्यांपर्यंत पाण्याची पातळी पोहोचली होती. त्यात घट होऊन आता ६० टक्क्यांपर्यंत खालावली आहे. जोपर्यंत पुण्यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढत नाही, तोपर्यंत उजनीच्या पाणीसाठ्यात वाढ होणार नाही.

गेल्या दोन दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात सर्वदूर संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी सुखावला आहे. परंतु पुणे जिल्ह्यातील धरण पट्ट्यात गेला महिना पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे उजनीत येणाऱ्या पाण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने उजनीच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याऐवजी पाण्याची पातळी कमी होत आहे. मागील आठवड्यात ६२ टक्के, वर असणारी उजनी धरणाची टक्केवारी मंगळवारी ६० टक्के एवढी आहे. म्हणजे दोन टक्के उजनीची टक्केवारी घटली आहे.

सद्य:स्थितीला उजनीची पाणी पातळी ४९४.९१० मीटर आहे, तर एकूण पाणीसाठा ९६.२५ टीएमसी आहे. उपयुक्त पाणीसाठा ३२.६० टीएमसी आहे, तर ६०.८४ टक्केवारी आहे. दौंंडमधून २७१७ क्यूसेक विसर्ग उजनीत येत आहे, तर उजनीतून दहिगाव उपसा सिंचन योजनेला १२६ क्यूसेक, बोगद्यातून १५० क्युसेकने तर कालव्यातून ११०० क्यूसेकने विसर्ग उजनी धरणातून सोडण्यात येत आहे.

..........

मागच्या वर्षी ऑगस्टमध्येच धरण १०० टक्के

मागच्या वर्षी पुण्यातील धरण क्षेत्रांमध्ये अतिवृष्टी झाल्याने उजनी धरण ऑगस्ट महिन्यातच १०० टक्के भरले होते. यंदा सप्टेंबर महिना सुरू झाल्यानंतरही अद्यापही दर ६० टक्क्यांवरच आहे. धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्याऐवजी घट होत आहे. त्यामुळे यंदा उजनी १०० टक्के भरणार की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Web Title: Rain all over the district, decrease in Ujjain water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.