पाऊस ढगात, बियाणं घरात, बळीराजा चिंतेत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:16 AM2021-06-24T04:16:39+5:302021-06-24T04:16:39+5:30
जूनच्या पहिल्या आठवड्यात तुरळक पाऊस पडला. त्या पावसावर व पुढे पडणाऱ्या पावसाच्या अंदाजावर मांगी, जातेगाव, खडकी, पुनवर, हिवरवाडी, भोसे, ...
जूनच्या पहिल्या आठवड्यात तुरळक पाऊस पडला. त्या पावसावर व पुढे पडणाऱ्या पावसाच्या अंदाजावर मांगी, जातेगाव, खडकी, पुनवर, हिवरवाडी, भोसे, देवळाली, रोसेवाडी, गुळसडी, पांडे, खांबेवाडी, सरपडोह या भागातील शेतकऱ्यांनी तूर २,१०५ हेक्टर, उडीद ३,००५ हेक्टर, मूग ४९६ हेक्टर, बाजरी ३८२ हेक्टर, मका ९९५ हेक्टर, सूर्यफूल २०५ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या केल्या आहेत.
रोहिणी नक्षत्रात पडलेल्या पावसानंतर मृग नक्षत्र कोरडे गेले. गेल्या दहा-बारा दिवसापासून पावसाने ओढ दिल्याने तुरळक ठिकाणी पेरणी झालेले व पेरणी न केलेले दोन्हीही शेतकरी हवालदिल झाले आहेत. करमाळा तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने अद्याप १० हजार हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
----
पावसाने ओढ दिल्याने तालुक्यात जेऊर, साडे, सालसे, केम, आवाटी, रावगाव, वीट, विहाळ, मोरवड, झरे, पोथरे, आळजापूर, तरटगाव आदी ८० टक्के भागात खरीप पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतकऱ्यांनी बी-बियाणे बाजारातून खरेदी करून घरी नेऊन ठेवलेली आहेत. गतवर्षी तालुक्यात वेळेवर पडत गेलेल्या पावसामुळे उडदाचे विक्रमी उत्पादन व भाव शेतकऱ्यांना मिळाला होता. यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उडीद बियाणे खरेदी करून ठेवले आहे. दमदार पावसानंतरच पेरण्या होतील.
-----
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुरळक पाऊस झाला. या पावसावर १० जून दरम्यान पेरणी केली. त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने उडीद पीक कोमेजू लागले आहे.
- सिध्दार्थ कांबळे, शेतकरी
----२३करमाळा-पेरणी
करमाळा ग्रामीण येथे पावसाअभावी उडीद पीक कोमेजू लागले आहे.