पावसानं पुन्हा पडझड; पाण्यात घरांची रात्रभर धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 12:45 PM2019-09-24T12:45:33+5:302019-09-24T12:48:40+5:30

सोलापुरात कोसळधारा; दोन तासांमध्ये मुसळधार ११८ मिलिमीटर पाऊस

Rain falls again; Overnight striking of houses in the water | पावसानं पुन्हा पडझड; पाण्यात घरांची रात्रभर धडपड

पावसानं पुन्हा पडझड; पाण्यात घरांची रात्रभर धडपड

Next
ठळक मुद्देमहापालिकेने नाला स्वच्छ न केल्यामुळे घरात पाणी शिरल्याचा आरोप नागरिकनी केलाकुमार चौक परिसरात असलेला नाला भरुन वाहत होतास्टेशन परिसरातील रोटे अपार्टमेंटमध्ये देखील नाल्याचे पाणी घरात शिरले

सोलापूर : रविवारी आणि सोमवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. रात्री ११ वाजता सुरू झालेला पाऊस पहाटे दीड वाजेपर्यंत सुरू होता. अनेकांनी अख्खी रात्र जागून काढत घरातील पाणी बाहेर काढण्याचा खटाटोप केला. पाणी काढण्याची सकाळी नऊ वाजेपर्यंत कसरत सुरू होती. शहरातील विजापूर नाका, नेहरू नगर, कमला नगर, भवानी पेठ, कुंभार वेस, काडादी चाळ, ब्रह्मदेव नगर, चैतन्य नगर, सहारा परिसर, कल्याण नगर या भागातील घरात पाणी शिरले.

बुधवारी (ता. १८) असाच पाऊस पडल्याने अनेक घरात पाणी शिरले होते. महापालिकेने नाला स्वच्छ न केल्यामुळे घरात पाणी शिरल्याचा आरोप नागरिक ांनी केला होता. इतके होऊनही स्वच्छता न केल्याने आता पुन्हा पावसाचे पाणी घरात शिरले असल्याचे नागरिकांनी सांगितले. रविवारी रात्री काडादी चाळ परिसरातील घर तसेच दुकानांमध्ये पाणी शिरले होते. हे पाणी रेल्वे स्टेशन परिसरातील नाल्यातून येत असल्याने त्याची दुर्गंधी येत होती. रात्री अडीच फूट पाणी शिरले होते. 

या परिसरात असलेल्या दुकानातील पूजेचे साहित्य, पैसे, गुलाल, झाडू व इतर साहित्य भिजून खराब झाले. शेजारीच असलेल्या घरातील एका विद्यार्थिनीची वह्या, पुस्तके भिजून गेली. सोमवारची सकाळ वह्या, पुस्तके सुकविण्यात गेली. कुमार चौक परिसरात असलेला नाला भरुन वाहत होता. सोमवारी सायंकाळपर्यंत हा नाला बाहेर जोराने वाहत होता. या नाल्यातील पाणी रात्री परिसरातील घरात शिरले होते. स्टेशन परिसरातील रोटे अपार्टमेंटमध्ये देखील नाल्याचे पाणी घरात शिरले. सोमवारी दुपारी महापालिकेच्या कर्मचाºयांनी पाण्याचा निचरा व्हावा यासाठीच्या कामास सुरुवात केली.

लांब उडी घेता येत असल्यासच चाळीत यावे..
- काडादी चाळीच्या मागे पावसाचे नालामिश्रित पाणी आले होते. यामुळे येथील रहिवाशांच्या अंगणात पाणी आले, तर समोरच्या परिसराला तलावाचे स्वरुप आले होते. पाण्याचा निचरा झाल्यानंतर या परिसरात सगळीकडे चिखल झाला आहे. त्यामुळे वाहने चालवणे दूर तर चालताही येत नाही. या परिसरात यायचे असल्यास लांब उडी व उंच उडी येणे गरजेचे असल्याची उपहासात्मक टीका नागराज कळंत्री या नागरिकाने केली. या भागाकडे महापालिका व नगरसेवकांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप त्यांनी केला.

लष्करमध्ये भिंत पडल्याने दोघे जखमी
- रविवारी रात्री जोराचा पाऊस पडल्याने लष्करमध्ये घराची भिंत पडली. यात दोघे जखमी झाले असून, एकाला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्रभाकर महाराज मंदिर परिसर व भवानी पेठ येथील वैदूवाडी येथे पावसामुळे झाड पडले. न्यू बुधवारपेठ परिसरातील मस्के यांच्या घराची भिंत पडली. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेनगर, जुना कारंबा नाका, नरसिंग गिरजी चाळ, प्रभाकर महाराज मंदिराजवळील भगवती सोसायटी येथील घरातही पावसाचे पाणी शिरले होते. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेनगर व परिसरातील पाण्याचा निचरा न झाल्यास नाल्यात बसून आंदोलन करु, असा इशारा एका नगरसेवकांनी दिला.

दुकानात ठेवलेले पूजेचे साहित्य, पैसेदेखील पाण्यात भिजले. पावसाचे पाणी हे नालामिश्रित असल्याने घर, दुकानात दुर्गंधी येत आहे. सकाळी १० वाजेपर्यंत घरातील पाणी बाहेर काढले, दुपारी घर स्वच्छ केले.
- कस्तुरबाई कचणूर, दुकानचालक, काडादी चाळ

नाल्याचे घाण पाणी घरात शिरत असल्याची ही पहिली वेळ नाही. थोडा मोठा पाऊस झाला तर घरात पाणी शिरते. महापालिका कायमचा उपाय करत नाही. तात्पुरती नालेसफाई करु न हा प्रश्न सुटणार नाही.
- महादेवी कुडल, महिला, काडादी चाळ

Web Title: Rain falls again; Overnight striking of houses in the water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.