सोलापूरला पावसानं झोडपलं, ओढे-नाले भरले तुडुंब; सीना, भोगावती नदीचं पाणी वाढलं
By काशिनाथ वाघमारे | Published: June 12, 2024 08:14 PM2024-06-12T20:14:58+5:302024-06-12T20:15:30+5:30
नरखेडमधील ओढे-नाले भरले तुडुंब; सीना वाहू लागली तर भोगावतीला पूर
सोलापूर : मोहोळ तालुक्यात नरखेड आणि बार्शी तालुक्यात पडलेल्या विजांच्या कडकडाटासह झालेल्या रोहिणी नक्षत्राच्या जोरदार पावसाने झोडपून काढले आहे. परिणामत: नरखेड परिसरातील ओढ्या-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले असून पिकांमध्ये, शेतात सर्वत्र पाणी साठून तळ्याचे रूप आले आहे.
सीना नदीला मध्यम स्वरूपाचे पाणी आले आहे. ती पाण्याने वाहू लागली आहे तर तुळजापूर व बार्शी तालुक्यात पडलेल्या रोहिणी नक्षत्राच्या पावसाने भोगावती नदी तुडुंब भरून वाहू लागली आहे. भोगावती नदीला यावर्षी दुसऱ्यांदा पाणी आले आहे. यावेळी मात्र पूरसदृश परिस्थीती निर्माण झाली आहे.
देगांव (वा), डिकसळ नरखेड, भोयरे, घाटणे, हिंगणी (नि ), शिरापूर (सो), लांबोटी आदी गावांजवळून भोगावती नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे नदीकाठावरील सर्व गावांचा पाण्याचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे.