सोलापूर जिल्ह्यातील पाऊस झाला गायब; शिवार पडले उजाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 11:32 AM2018-08-13T11:32:01+5:302018-08-13T11:34:56+5:30
बळीराजा चिंतेत : हातची पिके वाया; जनावरांच्या चाºयाचा प्रश्न बनला गंभीर
सोलापूर : जूनच्या पहिल्या सप्ताहात दमदार पाऊस झाला. बळीराजा सुखावला अन् पेरण्या करुन मोकळा झाला. पेरण्या झाल्यावर मात्र पाऊस गायब झाला. त्यामुळे हातची आलेली पिके जातात की काय ? असे चित्र गायब झालेल्या पावसाने निर्माण करुन ठेवले. खरीप हंगाम वाया जाण्याच्या मार्गावर असून, त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. जनावरांच्या पाण्याचा अन् चाºयाचाही प्रश्न गंभीर बनला आहे.
अक्कलकोटमध्ये तुरीची वाढ खुंटली
अक्कलकोट: वीस दिवसांपासून पाऊस नसल्याने तालुक्यातील उडीद, मूग, सोयाबीन ही खरीप पिके शेतकºयांच्या हातून पूर्णपणे जाण्याच्या मार्गावर आहेत. तूर हे पीक तग धरून असले तरी वाढ खुंटून उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकंदरीत यंदाच्या खरीप हंगामातील ६८ हजार २९८ हेक्टरवरील विविध प्रकारची पिके धोक्यात असल्याने यावर पाणी सोडावे लागणार आहे.
पाच वर्षांत यंदा प्रथमच अक्कलकोट तालुक्यात पावसाळा हंगामाच्या सुरुवातीलाच उत्तम प्रकारे पाऊस झाला. यामुळे शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात खरीप पिकांची पेरणी केली. भात ८७ हेक्टर, बाजरी ९८१, मका २,९०८, तूर ३२,३६६, उडीद १७,२२९, मूग ७,०९६, भुईमूग १,३६४, तीळ १३३, सूर्यफूल १,७४५, सोयाबीन ४,५७१, कारळ १०३, कापूस २६६ असे एकूण विविध प्रकारचे ६८ हजार २९८ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली आहे. या सर्व पिकांना सध्या पावसाची अत्यंत गरज असताना वीस दिवसांपासून तालुक्यातून पाऊस बेपत्ता झाला आहे.
यामुळे उडीद, मूग, सोयाबीन यासारखे पिके पावसाअभावी माना टाकत आहेत. मध्यम, हलक्या जमिनीतील खरीप पिके वाळून गेल्यामुळे काढून टाकण्याची तयारी शेतकरी करीत आहेत. चांगल्या जमिनीतील पिकांना आणखीन पाच ते दहा दिवसांचा अवधी असला तरी त्या दरम्यान पावसाची हजेरी न लागल्यास १०० टक्के पिके शेतकºयांच्या हातून जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सर्वत्र तूर पीक चांगल्या प्रकारात असून सध्या तूर वगळता सर्व पिके फुलोरा अवस्थेत आहेत. पाऊस नसल्याने विहीर, बोअरची पाण्याची पातळी खालावत चालली आहे. विविध तलाव, पाझर तलाव कोरडे पडले आहेत.
करमाळ्यात चाºयाचा प्रश्न गंभीर!
करमाळा : पावसाने पाठ फिरवल्याने करमाळा तालुक्यातील ४ हजार ५४८ हेक्टर क्षेत्रावरील उभी खरीप पिके वाया गेली असून, पाऊस पडत नसल्याने जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने शेतकरी चिंतातुर बनला आहे.
करमाळा तालुक्यात मृग, आर्द्रा, पुर्नवसू व पुष्य ही चारही नक्षत्रे कोरडी गेली आहेत. सध्या सुरू असलेल्या आश्लेषा नक्षत्रातही पावसाचा पत्ता नाही. आकाशात ढगांची गर्दी होते पण दोन..चार थेंब पडतात व पाऊस गायब होतो. रोहिण्या बरसल्यानंतर शेतकºयांनी पावसाच्या भरवशावर जमिनीच्या मशागती केल्या. तालुक्यात खरीप अंतर्गत बाजरी ४४४ हेक्टर, मका १०७८ हेक्टर, तूर १५१६ हेक्टर, मूग ४२० हेक्टर, उडीद ६१६ हेक्टर, सूर्यफूल १४५ हेक्टर पेरण्या झाल्या असून पेरलेले बी उगवलेही पण पावसाने दीर्घ दडी मारल्याने खरीप पिके जळून जात आहेत. गतवर्षी सुरुवातीपासूनच समाधानकारक पाऊस पडल्याने खरिपाची १३ हजार ५९१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती; मात्र यंदा मात्र ४ हजार ५४८ हेक्टर क्षेत्रावरच खरीप पेरण्या झाल्या आहेत.
करमाळा तालुक्यात यंदाच्या मान्सूनमध्ये आजअखेर करमाळा १३६.५ मि. मी., जेऊर ८२ मि. मी., सालसे ६७ मि. मी., कोर्टी १०१ मि. मी., केम ५६ मि. मी., अर्जुननगर १२ मि. मी., केत्तूर ६१ मि. मी., उम्रड १०३ मि. मी. याप्रमाणे सरासरी ७७.३१ मि. मी. पावसाची तालुक्यातील आठ मंडळ निहाय पर्जन्यमापक यंत्रात नोंद झाली आहे.
सोयाबीनचे प्रमाण अधिक
दर्शनाळ, अरळी, हन्नूर, चुंगी, पितापूर, किणी, घोळसगाव, किणीवाडी, काझीकणबस या भागांमध्ये सोयाबीन पेरणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. तालुक्यात सर्वत्र खरीप पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली असली तरी तडवळ, करजगी, जेऊर मंडळात खरीप पिकांची सर्वाधिक वाईट परिस्थिती आहे. त्याखालोखाल नागणसूरचीसुद्धा परिस्थिती फारशी चांगली नाही.
करमाळा तालुक्यात उसाचे क्षेत्र घटणार..
गतवर्षी समाधानकारक पाऊस पडला होता. यामुळे तलाव, विहिरी, तुडुंब भरल्या होत्या. उजनीसह सीना-कोळगाव प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा झालेला होता. यामुळे करमाळा तालुक्यात पाण्याची उपलब्धता व पावसाच्या आशेवर शेतकºयांनी १६ हजार ५३६ हेक्टर क्षेत्रात उसाची लागण केली होती. पण पावसाने हुलकावणी दिल्याने उगवलेला ऊस वाळून गेला असून यंदाच्या हंगामात उसाचे क्षेत्र घटणार आहे.
मांगीत २0 टक्केच पाणी
करमाळ्यात सुरुवातीपासूनच पावसाने ब्रेक दिल्याने मांगी लघुप्रकल्पात २० टक्के पाणीसाठा असून वडशिवणे, राजुरी, पारेवाडी, हिंगणी, नेरले, म्हसेवाडी, कुंभेज, सांगवी, वीट हे सर्व मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत. ८० टक्के विहिरी, ४८ पाझर तलाव क ोरडे असून सीना नदीवरील तीन कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयात पाणी नसून सीना नदी कोरडी पडली आहे.
पाच वर्षांत प्रथमच यंदा पावसाळ्याच्या प्रारंभी चांगल्या प्रकारे पाऊस झाल्याने शेतकºयांना अनेक अडचणी असतानासुद्धा पैशाची जुळवाजुळव करून खरीप पिकाची पेरणी केली आहे. त्याप्रमाणे चांगल्या प्रमाणात पिके डोलू लागली होती; मात्र अचानकपणे १५ ते २० दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने शेतकºयांवर संकट निर्माण झाले आहे. मात्र सध्या पावसाची अत्यंत गरज आहे. नाहीतर पिके संकटात सापडण्याची शक्यता आहे. शासनाचे प्रात्यक्षिक तूर पीक अत्यंत उत्तम प्रकारे आले आहे.
-राम फडतरे,
अक्कलकोट तालुका कृषी अधिकारी
अक्कलकोट तालुका कृषी कार्यालयाकडून तुरीचे प्रात्यक्षिक म्हणून तालुक्यातील २२ गावांमध्ये प्रत्येक गावात २५ शेतकºयांचा एक गट तयार करून प्रत्येक शेतकºयाला एक हेक्टरप्रमाणे प्रत्येक गावात दहा हेक्टर शासनाकडून प्रात्यक्षिक करण्यात आले आहे. ही सर्वच पिके येत्या आठवडाभरात पाऊस नाही झाल्यास वाया जाण्याची भीती आहे.
-सुरेश सूर्यवंशी, शेतकरी