सोलापूर जिल्ह्यात सहाव्या महिन्यातही पाऊस; शेतीपिकांचे मोठे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2021 06:53 PM2021-11-22T18:53:05+5:302021-11-22T18:53:08+5:30
जूनपासून सुरु झाला : शेतीचे नुकसान काही केल्या थांबेना
सोलापूर : जिल्ह्यात सहाव्या महिन्यातही पाऊस पडत असल्याने ॠतुमान बदलले की काय? असे चित्र निर्माण झाले आहे. अगोदरच पिकांसाठी नुकसानकारक ठरलेला पाऊस त्यात आणखीन भर घालत आहे.
सोलापूर जिल्ह्यात यावर्षी पावसाळ्यातील चार महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला होता. ऑक्टोबरनंतर नोव्हेंबर महिन्यातही पाऊस पडत आहे. जून महिन्यात सुरू झालेला पाऊस सतत पडत असल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. खरीप पिकांना पावसाचा मोठा फटका बसला. शिवाय इतर पिकांचेही मोठे नुकसान झाले. त्यातूनही तग धरलेल्या पिकांचे सध्या सुरू असलेल्या पावसामुळे नुकसान होत आहे.
जून ते २१ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या १०५ टक्के इतका पाऊस पडला आहे. जिल्ह्यात एकूण ५९१.५ मि. मी. पाऊस पडणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात ६२१.५ मि. मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
मोहोळ अन् बार्शी तालुके
मोहोळ तालुक्यात १२६ टक्के, तर बार्शी तालुक्यात १२४ टक्के इतका पाऊस पडला आहे. उत्तर तालुक्यात ११४, दक्षिण तालुक्यात १०८ टक्के, मंगळवेढा व अक्कलकोट तालुक्यात अनुक्रमे १०३ टक्के पाऊस पडला. उर्वरित पाच तालुक्यात ९० ते ९९ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
0 मिलिमीटरमध्ये बार्शी तालुक्यात सर्वाधिक ७६६ मि. मी. उत्तर तालुका ७५४ मि. मी., मोहोळ तालुका ६९७ मि. मी., दक्षिण सोलापूर ६८५ मि. मी., अक्कलकोट ६७१ मि. मी., उर्वरित तालुक्यात ५९३ ते ५२३ दरम्यान पाऊस झाला आहे.
बार्शी तालुक्यात ६४ दिवस पाऊस
सोलापूर जिल्ह्यात यावर्षी एक जून रोजी पावसाला सुरुवात झाली होती. अधून- मधून पावसाला खंड पडत असला तरी अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस पडत आहे. बार्शी तालुक्यात जून ते २० नोव्हेंबर या कालावधीत ६४ दिवस, उत्तर तालुक्यात ६० दिवस, माळशिरस तालुक्यात ५९ दिवस, मोहोळ तालुक्यात ५८ दिवस, माढा व पंढरपूर प्रत्येकी ५५ दिवस, दक्षिण तालुका व सांगोला प्रत्येकी ५४ दिवस, अक्कलकोट तालुक्यात ५१, तर करमाळा व मंगळवेढा प्रत्येकी ४९ दिवस पावसाने हजेरी लावली.