पावसाच्या पाण्याने बोरामणी येथील शेततळ्यात पावणेदोन कोटी लिटर पाणी भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 12:09 PM2019-01-16T12:09:42+5:302019-01-16T12:12:51+5:30
सोलापूर : सोलापूर म्हटले की दुष्काळी जिल्हा अशी ओळख. यंदा तर ५० टक्केही पाऊस नसल्याने सगळीकडे पाणीटंचाईच. अशा परिस्थितीत ...
सोलापूर : सोलापूर म्हटले की दुष्काळी जिल्हा अशी ओळख. यंदा तर ५० टक्केही पाऊस नसल्याने सगळीकडे पाणीटंचाईच. अशा परिस्थितीत दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील शेतकरी सिद्राम बिराजदार यांनी एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल पावणेदोन कोटी लिटर पाण्याचा साठा शेततळ्यात पावसाच्या पाण्याने करून ठेवला आहे. या पाण्यावर बिराजदार यांची वीस एकर द्राक्षबाग बहरत असून त्यांच्या या उपक्रमाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भरभरून कौतुक केले आहे.
बिराजदार यांनी मागील वर्षी आपल्या शेतात सुमारे अर्धा एकर क्षेत्रात सामूहिक शेततळे योजनेतून तळे बांधले. यासाठी त्यांना तब्बल १५ लाख रुपयांचा खर्च आला आहे. राज्य शासनाचे त्यांना ३ लाख ३९ हजार रुपयांचे अनुदान यासाठी मिळाले आहे. शेततळे पूर्ण झाल्यानंतर उन्हाळ्यात पाण्याची सोय व्हावी, यासाठी बिराजदार यांनी पावसाच्या पाण्याने पावसाळ्यात शेततळे भरून घेतले. त्यानंतर विहीर व बोअरच्या पाण्याचाही साठा याठिकाणी केला. त्यामुळे त्यांच्या आज सुमारे वीस एकर द्राक्षबागेस पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शेततळ्यामधील पाण्याचा आधार असल्याने बिराजदार यांनी सरिता, नानासाहेब, थॉमसन, आर. के., शरद, मणिकर, डबल एस आदी जातींची द्राक्षलागवड केली आहे. यासाठी त्यांनी आतापर्यंत वीस एकर क्षेत्रासाठी तीस ते चाळीस लाख रुपयांचा खर्चही औषधे, मजुरी आदींसाठी केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसंवाद कार्यक्रमांतर्गत बिराजदार शेतकरी कुटुंबीयांशी व्हिडीओ कॉन्फरन्सने सोमवारी संवाद साधला. सोलापूर जिल्ह्यात ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस असताना शेततळ्याच्या माध्यमातून सुरू असलेल्या बागायती शेतीचे त्यांनी भरभरून कौतुक केले. शेततळे बांधण्यासाठी अनुदान अपुरे असून अनुदान वाढविण्यात यावे, ठिबक सिंचनसाठी शंभर टक्के अनुदान देण्यात यावे, अशी मागणी यावेळी सिद्राम बिराजदार यांचे सुपुत्र आप्पा यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली. मागेल त्याला शेततळे योजना व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या दोन्ही योजनांतून शेततळे घेण्याचा मार्ग आता मोकळा असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. बागायतदार शेतकरी सिद्राम यांच्या पत्नी निर्मला यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी संवाद साधला.
एक कोटीचे द्राक्ष काढणार - बिराजदार
- शेततळ्याच्या पाण्यावर विविध प्रकारच्या जातीचे द्राक्ष उत्पादन घेण्याचा प्रयत्न आमच्याकडून होत आहे. गतवर्षी सुमारे ५० लाख रुपयांची द्राक्षं यु.के व बांगलादेश यासारख्या देशासाठी निर्यात झाली आहेत. यंदाच्या वर्षीही निर्यात होणार असून, यातून सुमारे एक कोटी रुुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया यावेळी आप्पा बिराजदार यांनी दिली.