पावसाने बंद पाडला बार्शी-तुळजापूर, बार्शी- भूम रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:26 AM2021-09-06T04:26:48+5:302021-09-06T04:26:48+5:30
बार्शी तालुक्यात यंदा तिन्ही महिन्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. आगळगाव आणि भूम तालुक्यातील गावांत पाऊस पडल्याने चांदणी नदीला ...
बार्शी तालुक्यात यंदा तिन्ही महिन्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. आगळगाव आणि भूम तालुक्यातील गावांत पाऊस पडल्याने चांदणी नदीला पूर आला. आगळगाव मंडळात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे कंदलगाव शिवारातील सुमारे एक हजार एकरावरील सोयाबीन, उडीद, ऊस, कांदा आदी पिके पाण्याखाली जाऊन मोठे नुकसान झाले. कित्येक जणांचा शेतात काढून ठेवलेला उडीद वाहून गेला. खांडवीत सर्वाधिक पाऊस झाल्याने शिवारात सर्वत्र पाणीच दिसत असल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. बार्शी-सिरसाव, बार्शी-भूम आदी मार्गांवर कांदलगाव व देवगाव, तसेच मांडेगाव येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक दुपारपर्यंत बंद होती. तुळजापूर रस्त्यावरील बार्शीजवळ घोर ओढ्याला पाणी आल्याने हा मार्गही बंद होता. बार्शी शहरातील सखल भागात पाणी साचले होते.
......
चांदणी धरण ओव्हरफ्लो
बार्शी शहराला पाणीपुरवठा करणारे परांडा तालुक्यातील चांदणी मध्यम धरण ओव्हरफ्लो झाले आहे. बार्शी तालुक्यातून वाहणारी चांदणी नदी यंदा प्रथमच तब्बल दोन महिन्यांपासून वाहत आहे. त्यात आज चांदणीला व या तलावाला मिळणाऱ्या उर्वरित बाणगंगा नदीलाही पूर आल्याने हा प्रकल्प एका रात्रीत १०० टक्के भरून ओव्हरफ्लो झाला आहे. प्रकल्पाचा सांडवा भरून वाहत होता. हे पाणी सीना नदीला जाऊन मिळत आहे.
........
मंडलनिहाय पाऊस
बार्शी- ७६.८, आगळगाव- ६६.५, वैराग- ३३.५, पानगाव- ६३.५, सुर्डी- २९.५, गौडगाव-२९.३, पांगरी- १९.५, नारी- २६.५, उपळे दु.- १२.५, खांडवी- ६२.८. एकूण पाऊस- ४३० मिमी यावर्षीच्या तीन महिन्यांत ४३९ मिमी पाऊस पडला असून, तो सरासरीच्या ११४ टक्के आहे.
...............
फोटो :
बार्शी तालुक्यातील शनिवारी रात्री पडलेल्या पावसामुळे आगळगाव येथील रानात सर्वत्र पाणीच पाणी साचल्याचे दिसून येत आहे.
......
(फोटो ०५बार्शी)