राज ठाकरे सोलापुरात येणार, पण काँग्रेसचे पदाधिकारी मंचावर नसणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 12:47 PM2019-04-06T12:47:09+5:302019-04-06T12:55:20+5:30
राज ठाकरे यांची १५ एप्रिल रोजी सोलापुरात सभा; भाजपाविरोधात करणार प्रचार
सोलापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे १५ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सोलापुरात जाहीर सभा घेणार आहेत. या सभेला समविचारी पक्षांना आमंत्रित करण्यात येईल. पण मंचावर मनसे पदाधिकारी वगळता इतर पक्षाचे नेते नसतील, अशी माहिती मनसेचे जिल्हा संघटक दिलीप धोत्रे यांनी दिली.
धोत्रे म्हणाले, राज ठाकरे यांचा सोलापूर दौरा निश्चित झाला आहे. जाहीर सभेसाठी मैदान निश्चित करण्यात येत आहे. ही जाहीर सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या धोरणांविरोधात आहे. राज्याच्या विविध भागातील मनसेचे कार्यकर्ते काँग्रेस आणि राष्टÑवादीच्या प्रचारात सक्रिय आहेत. पण सोलापुरात होणाºया राज ठाकरे यांच्या सभेत काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे अथवा काँग्रेसचे इतर पदाधिकारी मंचावर नसतील.
या सभेला सर्व पक्षांना निमंत्रित करण्यात येणार आहे. मोदींनी २०१४ मध्ये सोलापुरात दिलेली आश्वासने, प्रत्यक्षात झालेले काम, भाजपचे उमेदवार, त्यांचे बोगस जातवैधता प्रमाणपत्र, भाजपच्या दोन मंत्र्यांचे काम आदी माहिती मनसेच्या वरिष्ठ नेत्यांना पाठविण्यात आलेली आहे. माढा मतदारसंघातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाºयांना या सभेला आमंत्रित करण्यात येणार आहे.
राज ठाकरे यांच्याकडे भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर महाराज यांची कुंडली आहे. परवाच्या भेटीत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात रान पेटविण्याचे आदेश राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना दिले आहे. सोलापूरची सभा काँग्रेससाठी आहे. पण या मंचावर काँग्रेस नेते नाहीत. त्यामुळे ती मनसेची सभा आहे. भाजपला तोटा झाला पाहिजे, हाच मनसेचा अजेंडा आहे.
- दिलीप धोत्रे,
जिल्हा संघटक, मनसे.