राजन पाटलांनी थेट फडणवीसांना गाठले, राष्ट्रवादीवर सर्जिकल स्ट्राईकची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 06:26 AM2022-07-26T06:26:37+5:302022-07-26T06:27:06+5:30
सोबतीला माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनाही घेतले. दिल्लीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि दोघांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सोलापूर : माेहोळचे माजी आमदार राजन पाटील व बळीराम साठे या दोघांनी रविवारी सिल्व्हर ओकवर शरद पवारांची भेट घेतली. लवकरच पुन्हा बैठक घेण्याचा निरोप घेतल्यानंतर सोमवारी राजन पाटील यांनी थेट दिल्लीच गाठली.
सोबतीला माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनाही घेतले. दिल्लीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि दोघांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली. गेल्या काही दिवसांपासून राजन पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यातच रविवारी पाटील आणि बळीराम साठे या दोघांनी पवार यांची भेट घेतली. रविवारी पुन्हा बैठक घेण्याचे ठरले होते; मात्र लगेच सोमवारी पाटील यांनी दिल्ली गाठून भाजपच्या नेत्यांची भेट घेतली. सोबतीला आमदार बबनराव शिंदे हेही होते.
आमच्या कारखान्याच्या व इतर काही कामासाठी दिल्लीला गेलो होतो. सहजासहजी फडणवीस यांची भेट झाली. ज्यांची सत्ता असते त्यांच्या वरिष्ठांना भेटण्यास काहीच गैर नाही. मी आहे तेथेच आहे. गैरसमज पसरवू नयेत. - बबनराव शिंदे, आमदार
मी व आमदार बबनराव शिंदे दोघेही दिल्लीत महाराष्ट्र सदनात होतो. तेव्हा त्या ठिकाणी फडणवीसही असल्याचे कळाले. तेव्हा कारखान्याच्या कामानिमित्त त्यांची भेट घेतली. त्यामुळे भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही.
- राजन पाटील, माजी आमदार
राष्ट्रवादीवर सर्जिकल स्ट्राईकची चर्चा
nमुंबई : आता राष्ट्रवादीवर भाजप सर्जिकल स्ट्राईक करणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे एक बडे नेते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चादेखील जोरात आहे. या नेत्याचे शिवसेना-राष्ट्रवादी असे करत भाजपमध्ये गेलेल्या एका नेत्याशी जवळचे नातेसंबंध आहेत. या नेत्याची भाजप प्रवेशाबाबत एकदोन नेत्यांशी चर्चा झाली असल्याचे सांगितले जाते. या नेत्याच्या भाजप प्रवेशाला त्याच जिल्ह्यातील एका भाजप आमदाराचा विरोध आहे.
nशिंदे मंत्रिमंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादीचे तीन-चार चेहरे दिसू शकतात असा एक तर्क आहे.