राजलक्ष्मीच्या जाण्याने शाळाही हळहळली...!

By admin | Published: July 21, 2014 01:13 AM2014-07-21T01:13:33+5:302014-07-21T01:13:33+5:30

लिफ्टने घेतला बळी : शाश्वत अपार्टमेंटमधील प्रकार

Rajlakshmi goes to school too ...! | राजलक्ष्मीच्या जाण्याने शाळाही हळहळली...!

राजलक्ष्मीच्या जाण्याने शाळाही हळहळली...!

Next


सोलापूर : प्रत्येक वर्षी नंबर वन... हुशार, हरहुन्नरी... शिकवलेले अन् न शिकवलेले... वर्गातील, इतर वर्गांमधीलही मैत्रिणींची साथसंगत कायम ठेवणारी राजलक्ष्मी उर्फ अमिशाने रविवारी सकाळी जगाचा निरोप घेतला. तिच्या जाण्याने गणपती घाटानजीक असलेली सरस्वती विद्यामंदिर हळहळली. दत्त चौकातील शाश्वत मॅझिस्टिक या अपार्टमेंटमधील लिफ्टमध्ये अडकलेल्या राजलक्ष्मीला विजेच्या धक्क्याच्या रुपात आलेल्या काळाने झडप घातली.
माजी नगरसेविका जयश्री शिंदे आणि सामाजिक कार्यकर्ते संजय शिंदे यांची राजलक्ष्मी ही कन्या तर गामा पैलवान यांची नात. वर्षभरापूर्वी कुटुंबातील सर्वच सदस्य दत्त चौकातील शाश्वत अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावर राहायला आले होते. घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सरस्वती विद्या मंदिरात सातवीत शिकत होती. टॅलेंट असलेल्या राजलक्ष्मीची स्मरणशक्तीही जोरदार होती. मॉनेटर म्हणून ती वर्गही हॅन्डल करीत होती. शनिवारी तिने वैभवी अंजीखाने, वैभवी आडम, वैष्णवी गोब्बूर, वैष्णवी क्षीरसागर आणि विनिता पुडूर या पाच सवंगड्यांना घरी भोजनाचे आमंत्रण दिले होते.
मैत्रिणींच्या जेवणाची तयारी म्हणून आई जयश्री स्वयंपाकाच्या कामाला लागल्या होत्या. रविवारी सकाळी १० ची वेळ. राजलक्ष्मी ही आपली चुलत बहीण राजनंदिनीबरोबर लिफ्टमधून तळमजल्यावर आली. शाम्पू घेऊन लिफ्टमध्ये जात असतानाच अचानक दरवाजामध्ये ती अडकली गेली. त्यातच विजेचा धक्का बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. राजनंदिनी मात्र बाहेर असल्यामुळे ती बालंबाल बचावली. अखेर लिफ्ट तोडून तिला बाहेर काढण्यात आले. तोपर्यंत तिचा जीव गेला होता. शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. तिच्या अपघाती निधनाचे वृत्त वाऱ्यासारखे शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या, शिक्षक, शिक्षिकांच्या घरापर्यंत पसरले. ‘अशी मुलगी होणे नाही’, अशा भावना शाळेत तिला शिकवलेले, न शिकवलेले शिक्षक, शिक्षिकांनी व्यक्त केल्या. तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ बलराज असा परिवार आहे.
----------------------------
जेवण न देताच तू निघून गेलीस !
शाळा सुरु झाल्यानंतर प्रत्येक रविवारी एकीच्या घरी जेवणाचे आमंत्रण, असा बेत ठरला होता. पहिलेच आमंत्रण राजलक्ष्मीने दिले. रविवारी दुपारी १२ ते १ च्या दरम्यान तिच्या पाच मैत्रिणी येणार होत्या. त्याआधीच राजलक्ष्मीने जगाचा निरोप घेतला. जेव्हा ही बातमी कळली तेव्हा तिच्या पाचही मैत्रिणींच्या पायाखालची वाळू घसरली. वैभवी आडम, वैभवी अंजीखाने, वैष्णवी गोब्बूर, वैष्णवी क्षीरसागर आणि विनिता पुडूर यांनी हुंदके देत ‘जेवण न देताच तू निघून गेलीस...’ अशा भावना व्यक्त केल्या.
-------------------------
लिफ्टकडे दुर्लक्ष
शाश्वत अपार्टमेंटमधील दुसऱ्या मजल्यावर मनगोळी हॉस्पिटल आहे. ग्रामीण भागातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमुळे लिफ्टचा अधिक वापर होतो. वर्षभरापूर्वी लिफ्ट बंद पडली होती, याची आठवण करून देताना मराठा महासंघाचे दास शेळके यांनी राजलक्ष्मीच्या अपघाताचे कारण असुरक्षित लिफ्ट असल्याचे सांगितले.

Web Title: Rajlakshmi goes to school too ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.