राजश्री कल्याण यांनी स्वत:च्या घरालाच बनविले ज्ञानमंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:20 AM2021-03-19T04:20:43+5:302021-03-19T04:20:43+5:30
उडगी : कोरोनाच्या काळात शिक्षणात खंड पडू नये म्हणून कर्नाटक व महाराष्ट्र सीमेवर अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर गावात उपक्रमशील ...
उडगी : कोरोनाच्या काळात शिक्षणात खंड पडू नये म्हणून कर्नाटक व महाराष्ट्र सीमेवर अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर गावात उपक्रमशील शिक्षिका राजश्री कल्याण या वस्तीशाळेवरील महिला शिक्षिकेने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण क्षेत्रात स्वत:चे अध्यापनतंत्र विकसित केले आहे. संपूर्ण वस्तीशाळा शंभर टक्के प्रगतिपथावर नेण्यासाठी स्वत:च्या घरातच ज्ञानमंदिर बनवून सकाळी व संध्याकाळी त्या दररोज अखंडपणे विद्यार्थ्यांना ज्ञानदान करीत आहेत.
नागणसूर येथील वस्तीशाळेवर पहिली ते तिसरीपर्यंतचे तीन वर्ग भरतात. राजश्री कल्याण या हे वर्ग सांभाळतात. त्यांनी घरातील प्रत्येक भिंत ही बोलकी केली आहे. राजश्री कल्याण या घरी नसतानाही परिसरातील मुले त्यांच्या घरी जमतात आणि भिंतीवरील मजकूर वाचत राहतात.
राजश्री कल्याण या विद्यार्थ्यांना व्हिडिओ काॅलद्वारे संवाद साधून मार्गदर्शन करत असतात. यासाठी विविध अभ्यास कार्ड बनविणे, शब्दलेखन, वाचनपट्ट्या वाचून घेणे, बॅनरलेखन, प्रश्नाचे उत्तर मांडण्याची कला, प्रकटवाचन, हस्तकला, क्रीडा आदी कौशल्यांचा वापर करतात. पहिली ते पाचवीपर्यंतची संपूर्ण वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांना शंभर टक्के प्रगत करण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे. त्यांच्या या अध्यापन पद्धतीमुळे त्यांना शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.
---
माझ्या अध्यापन कार्यात मूळ शेतकरी असलेले माझे पती मल्लीनाथ कल्याण यांची मदत होते. अध्यापन कार्यात नवनवीन अध्यापन तंत्र विकसित करण्यास मदत होत आहे. कोरोनाच्या काळात शिक्षणात खंड पडू न देता आणखी वेगळ्या पद्धतीने सादरीकरण कसे करता येईल यावर भर आहे.
-राजश्री कल्याण,
उपक्रमशील शिक्षिका, नागणसूर
---
१८ नागणसूर
नागणसूर येथे वस्तीशाळेवरील शिक्षिका राजश्री कल्याण यांनी स्वत:च्या घराला ज्ञानमंदिराचा आकार दिला आहे.