स्वतंत्र लिंगायत धर्मासाठी एक सप्टेंबरला पुण्यात महामोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 03:45 PM2019-07-15T15:45:49+5:302019-07-15T15:49:36+5:30
लोकप्रतिनिधींच्या घरांसमोर आंदोलन; समन्वय समितीच्या बैठकीत निर्धार
सोलापूर : स्वतंत्र लिंगायत धर्माच्या मागणीसाठी येत्या एक सप्टेंबर रोजी पुण्यात अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या वतीने महामोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यातील सर्वच आमदार-खासदारांच्या घरांसमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय रविवारी सकाळी झालेल्या राज्यव्यापी बैठकीत घेण्यात आला.
समन्वय समितीची बैठक सकाळी मातोश्री स्व. सिद्धव्वाबाई हत्तुरे सांस्कृतिक भवनात घेण्यात आली. स्वतंत्र लिंगायत धर्माच्या मागणीसाठी आजपर्यंत अनेक आंदोलने करण्यात आली. तरीही पदरात काहीच पडेना म्हणून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात आली. समितीचे महासचिव विजयकुमार हत्तुरे यांनी या बैठकीचे आयोजन केले होते.
बंगळुरुचे पूज्य चन्नबसवानंद महास्वामी म्हणाले, नागमोहनदास समितीच्या अहवालानुसार लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता मिळाली पाहिजे. नागमोहनदास समितीचा अहवाल कोणीच नाकारु शकत नाही. दास समितीचा अहवाल केंद्र सरकारने स्वीकारला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक भाषणात महात्मा बसवेश्वरांचे विचार अन् तत्त्वे मांडतात. मात्र त्यांच्या संकल्पनेतील लिंगायत धर्माला त्यांनी मान्यता द्यायला हवी.
केंद्राने नागमोहनदास समितीच्या अहवालाचा अभ्यास करण्यासाठी १० तज्ज्ञांची नियुक्ती केली पाहिजे, अशी मागणीही चन्नबसवानंद महास्वामी यांनी केली.
प्रारंभी समितीचे महासचिव विजयकुमार हत्तुरे यांनी उपस्थितांचे स्वागत करुन, प्रास्ताविक केले. यावेळी डॉ. शिवलिंग शिवाचार्य, पूज्य डॉ. बसवलिंग पट्टदेवरु, जयमृत्युंजय महास्वामी, पूज्य शरणबसवलिंग महास्वामी, पूज्य माता महानंदाताई स्वामी आदी विविध मठांचे मठाधिपती, लिंगायत समाजातील मान्यवर आणि समितीचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. आभार राजाराम पाटील यांनी मानले. राज्यव्यापी बैठक यशस्वी करण्यासाठी सकलेश बाभुळगावकर, अजिंक्य उप्पीन, नागेश पडणुरे, धोंडप्पा तोरणगी, लिंगय्या स्वामी, विवेक हत्तुरे, प्रसाद चोरगी, ओंकार हत्तुरे यांनी परिश्रम घेतले.
संघर्ष करत राहणार- शिवलिंग शिवाचार्य
- स्वतंत्र लिंगायत धर्माच्या मागणीसाठी आजपर्यंत समितीचा संघर्ष सुरु आहे. तो याहीपुढे राहणार नाही. जोपर्यंत स्वतंत्र लिंगायत धर्मास मान्यता मिळत नाही, तोपर्यंत संघर्ष अधिक तीव्र करु, असा इशारा देताना डॉ. शिवलिंग शिवाचार्य यांनी लिंगायत समाजातील काही राजकारण्यांना राजकारण समजत नसल्याचे नमूद केले. तुमचा स्वाभिमान कुठे गेला, जो पक्ष आपली मागणी पूर्ण करीत नाही, त्या पक्षामागे जाऊ नका, असा सल्लाही डॉ. शिवलिंग शिवाचार्य यांनी दिला.