आरटीओचा कारभार रामभरोसे

By admin | Published: June 12, 2014 01:15 AM2014-06-12T01:15:10+5:302014-06-12T01:15:10+5:30

तीन अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त : १० हजार स्मार्टकार्ड, ७५०० लायसन्स प्रलंबित

Ram Bharosw of R.T.O | आरटीओचा कारभार रामभरोसे

आरटीओचा कारभार रामभरोसे

Next

सोलापूर: येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, दोन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अशा तीन महत्त्वाच्या पदांवर अधिकारी नसल्याने सध्या या कार्यालयाचा कारभार रामभरोसे चालला आहे. गेल्या सात महिन्यांपासून सुमारे दहा हजार स्मार्ट आर. सी. कार्ड व ७५०० विविध प्रकारचे लायसन्स प्रलंबित आहेत. याबाबतची कागदपत्रे सहीअभावी कार्यालयातच धूळखात पडली आहेत. नागरिकांना आपल्या कामासाठी हेलपाटे मारावे लागत आहे.
सोलापूर येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिलकुमार वळीव यांची सहा महिन्यांपूर्वी पुणे येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी अद्याप नवीन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नियुक्त झालेला नाही. अकलूज येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांच्याकडे सोलापूर कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे. पाटील हे अकलूज येथील कारभार पाहत महिन्यातून चार ते पाच वेळा सोलापुरातील कार्यालयात हजरेी लावतात. मात्र येथील कामाचा व्याप लक्षात घेता पेडन्सी वरचेवर वाढू लागली आहे.
सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक बी. पवार यांची वसई येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी अद्याप सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याची नियुक्ती शासनाने केलेली नाही. मुंबई येथून बदलून आलेले सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गुंजाळ यांच्याकडे पिंपरी चिंचवड आरटीओचा अतिरिक्त कार्यभार असल्याने पवार यांच्याकडून पदभार घेण्यासाठी आले होते.
-----------------------------
पोस्टाकडे बोट...
सोलापूर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अनेक कामे प्रलंबित आहेत. ही कामे पूर्ण झाली का याची दररोज शेकडो लोक दूरध्वनीवरुन चौकशी करतात तर अनेक जण समक्ष येऊन चौकशी करतात. मात्र त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नाही, तसेच कामही होत नाही. स्मार्ट आर. सी. कार्ड व लायसन्स पोस्टाद्वारे पाठविण्याची योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित कर्मचारी आपली कागदपत्रे पोस्टाद्वारे पाठविली, अशी थातूरमातूर उत्तरे नेहमीच मिळतात. मात्र काम काही पूर्ण होत नाही.
-----------------------------------
कोणाचाच कोणाला नाही पायपोस
जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या सोलापूर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात महात्त्वाच्या पदावरील तीन अधिकारी नसल्याने सध्या कोणाचाच कोणाला पायपोस राहिला नाही. नवीन वाहन नोंदणी, जुने वाहन हस्तांतरण, बँक बोजा, ना-हरकत दाखले, मोटार वाहनधारकांची पक्की लायसन्स, नूतनीकरणासाठी दिलेली लायसन्सची कामे प्रलंबित राहिली आहेत. या कामासाठी दररोज शेकडो नागरिक कार्यालयात हेलपाटे मारतात. मात्र या गंभीर समस्येकडे एकाही लोकप्रतिनिधीने लक्ष दिलेले नाही. सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकही गप्प आहेत.

Web Title: Ram Bharosw of R.T.O

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.