रामेश्वरची पहाट ठरली मृत्यूची वाट; नऊ महिन्यांच्या गिरीधरवरील पितृछत्र हरपले...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 11:59 AM2020-05-26T11:59:25+5:302020-05-26T12:03:29+5:30
‘एमपीएससी’चा अभ्यास थांबला अन् फौजदार होण्याचे स्वप्नही राहिले अधुरेच...
सोलापूर : हॅन्डबॉलपटू म्हणून ग्रामीण पोलीस दलात नोकरीचा श्रीगणेशा करणाºया रामेश्वर गंगाधर परचंडे यांनी ‘एमपीएससी’चा अभ्यास करून फौजदार होण्याची खूणगाठ मनाशी बांधली. कोरोना नाकाबंदीत झालेल्या हत्येने त्याचा अभ्यासही थांबला अन् फौजदार होण्याची खूणगाठ कायमची सुटली गेली. त्यामुळे सकाळी घरी लवकर येतो म्हणून सांगणाºया रामेश्वरच्या मृत्यूची वाट शुक्रवारी पहाटेच ठरली. नऊ महिन्याच्या गिरीधरवरील पित्याचे छत्र हरपल्याने आजी अन् मातेलाच आता पित्याचे प्रेम द्यावे लागणार आहे.
हॅन्डबॉलपटू म्हणून ओळख असलेले रामेश्वर गंगाधर परचंडे (वय ३0, रा. जोडभावी पेठ, सोलापूर) हे आठवीत असताना त्यांचे वडील गंगाधर परचंडे यांचे हृदयविकाराने निधन झाले होते. वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आई शैला व आजी पार्वती यांनी रामेश्वर परचंडे यांचे पालन पोषण केले. आई आणि आजीच्या संस्कारात शालेय शिक्षण घेतले. दयानंद कॉलेजमध्ये बी.ए. पर्यंत शिक्षण पूर्ण केले. कॉलेजच्या युगात हॅन्डबॉलचा खेळाडू म्हणून त्यांनी अनेक स्पर्धेत यश प्राप्त केले होते. खेळाडू पटू म्हणून त्यांची २0११ मध्ये सोलापूरच्या ग्रामीण पोलीस दलात भरती झाली. २0१३ साली त्यांचं ट्रेनिंग पूर्ण झालं. ग्रामीण पोलीस दलाकडून त्यांनी अनेक स्पर्धा खेळल्या. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस पटकावून सोलापूरची शान राखली होती.
अवघ्या २१ व्या वर्षी पोलीस भरती झाल्यानंतर रामेश्वर परचंडे यांनी २0१८ साली नम्रता यांच्याशी विवाह केला. २१ जुलै २0१९ रोजी गिरीधरचा जन्म झाला. गिरीधर सध्या अवघ्या नऊ महिन्यांचा आहे. गिरीधरला उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून गेल्या महिन्यात रामेश्वर यांनी कुलर, फ्रीज व अन्य वस्तूंची खरेदी केली होती. दररोज ड्यूटीवर जाताना मुलाला हातात घेऊन खेळवत होते. २१ मे रोजी रामेश्वर परचंडे यांना वडकबाळ येथील नाकाबंदीच्या ठिकाणी नाईट ड्यूटी लागली होती. रामेश्वर परचंडे हे ड्यूटीला निघाले, नेहमीप्रमाणे आई व पत्नीला मी सकाळी लवकर येतो असे सांगून घराबाहेर पडले. वडकबाळ येथील नाकाबंदीच्या ठिकाणी गेले, ड्यूटी जॉईन केली. २२ मे रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास पिकअप आली, त्याला अडवण्याचा प्रयत्न केला; मात्र गाडी थांबली नाही. पाठलाग करून गाडी अडवली. दुचाकीवरून उतरून गाडी चालकाकडे येत असताना त्याने धडक देऊन जखमी केले. दि.२३ मे च्या पहाटे ५ वाजेपर्यंत रामेश्वर परचंडे यांनी मृत्यूशी झुंज दिली; मात्र शेवटी त्यांनी जगाचा निरोप घेतला.
एकाच महिन्यात तिघांचा वाढदिवस...
च्रामेश्वर परचंडे यांचा जन्म दि. १७ जुलै रोजीचा आहे. पत्नी नम्रता यांचा जन्म दिवस दि. २७ जुलै आहे. नऊ महिन्यांचा मुलगा गिरीधर याचा जन्म दि. २१ जुलै रोजी झाला. तिघांचाही जन्मदिवस एकाच महिन्यात असून जुलै महिन्यात मुलाचा पहिला वाढदिवस आहे. हा वाढदिवस मोठ्या पद्धतीने साजरा करण्याचा विचार रामेश्वर परचंडे यांनी केला होता.