सत्तर दिवस शाळा चालवली; एकही विद्यार्थी पॉझिटिव्ह नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2021 03:25 PM2021-10-03T15:25:52+5:302021-10-03T15:25:59+5:30
अनगरनं करून दाखविलं; पालकांची पूर्वसंमती
अनगर : शाळा म्हणजे मुलांसाठी जणू आनंदाचा ठेवा... मित्रांच्या भेटी... डबा खाण्याचा आनंद... मैदानावरच्या खोड्या... मौज, दंगामस्ती... सगळीकडे आनंदी आनंद; पण गेल्या दीड वर्षापासून मुलांचा हा आनंद कोरोनाच्या महामारीने हिरावून घेतला आहे; पण याला अपवाद आहे निसर्गाच्या कुशीत असलेली अनगरची ही शाळा! ही शाळा मागील ७० दिवसांपासून अविरत सुरू आहे. योग्य ती काळजी घेतल्यामुळे इतक्या दिवसांत एकाही विद्यार्थ्याला संसर्ग झाला नाही. इतर शाळांना ही शाळा दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात अनगर या ठिकाणी माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कै. शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अनगर ही एक विविध उपक्रमांनी सुरू असलेली शाळा आहे. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २२०० विद्यार्थीसंख्या असलेली सर्वांत मोठी शाळा म्हणून हिला ओळखले जाते. या शाळेचे अनुकरण करत परिसरातील अनेक शाळा सुरू होत आहेत. शाळा चालू करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष विक्रांत पाटील व सचिव अजिंक्यराणा पाटील यांची प्रेरणा, तर गावकरी व पालकांचे मोलाचे सहकार्य आहे.
जुलै महिन्यात शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांच्या शिफारसीने शाळा सुरू करण्यासाठी स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा, असे परिपत्रक काढले व त्यानुसार संस्थाप्रमुख माजी आमदार राजन पाटील, ग्रामस्थ, पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी २२ जुलैपासून स्वजबाबदारीवर शाळा सुरू केली. आज या शाळेला ७० दिवस पूर्ण झालेले आहेत. सुरुवातीला पाचवी व सातवीचे वर्ग कट्ट्यावर, झाडाखाली, मोकळ्या मैदानात व व्हरांड्यात भरवण्यात आले. आज मात्र ही शाळा बिनधास्त भरतेय.
अनगर शाळेने अशी घेतली काळजी
- सर्व शिक्षकांची दोन वेळा आरटीपीसीआर कोरोना टेस्ट करण्यात आली.
- सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली व कोरोना रॅपिड टेस्ट करण्यात आली.
- शाळेच्या गेटवर थर्मल स्कॅनिंग, हँडवॉश व सॅनिटायझेशन करण्यात येते. सर्व विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची संमतीपत्रे घेण्यात आली.
- सर्व वर्ग भरायच्या व सुटायच्या वेळा वेगवेगळ्या ठेवल्या.
- शाळा सुटल्यानंतर वर्ग फवारून सॅनिटायझेशन केले.
- गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीत शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे सर्वाधिक नुकसान झालेले होते. यापुढे हे शैक्षणिक नुकसान आपणास परवडणारे नाही, म्हणून शाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिली.
-राजन पाटील, माजी आमदार
संस्थेचे प्रमुख राजन पाटील व पालकांच्या सहमतीने सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून शाळा सुरू केली व सर्वांच्या सहकार्यामुळेच ती सुरू झाली. आतापर्यंत एकही विद्यार्थी पॉझिटिव्ह सापडलेला नाही.
-चंद्रकांत ढोले, मुख्याध्यापक