संकटाला चॅलेंज देणारी चपळगावातील रणरागिणी, पती अंथरुणाला खिळून: मुलेही अंध, दिव्यांग अन् कर्णबधिर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 12:29 PM2018-01-01T12:29:37+5:302018-01-01T12:31:38+5:30
मर्यादा ओलांडून संकटे घरी आली आणि वास्तव्य करून अख्ख्या कुटुंबाला छळण्यास सुरुवात केली. पतीचे पाय लुळे पडलेले आणि तीन मुलांपैकी एक मुलगा मुका तर दुसरा दिव्यांग. दोघेही कर्णबधिर. अशा स्थितीत संकटांसमोर शरण न जाता आल्या दिवसाला मोठे चॅलेंज देत चपळगावातील रणरागिणी भाजीपाला विकून फाटलेल्या संसाराला ठिगळ लावत आहे.
शंभूलिंग अकतनाळ
आॅनलाइन लोकमत सोलापूर
चपळगाव दि १ : मर्यादा ओलांडून संकटे घरी आली आणि वास्तव्य करून अख्ख्या कुटुंबाला छळण्यास सुरुवात केली. पतीचे पाय लुळे पडलेले आणि तीन मुलांपैकी एक मुलगा मुका तर दुसरा दिव्यांग. दोघेही कर्णबधिर. अशा स्थितीत संकटांसमोर शरण न जाता आल्या दिवसाला मोठे चॅलेंज देत चपळगावातील रणरागिणी भाजीपाला विकून फाटलेल्या संसाराला ठिगळ लावत आहे.
ही करुण आणि जिद्दीची कहाणी आहे चपळगाव (ता. अक्कलकोट) येथील लिंबाबाई सिद्धप्पा रामपुरे या कर्तबगार महिलेची. प्रतिकूलतेला टक्कर देत यशस्वी आयुष्य जगण्याचा मूलमंत्र ती जणू जगाला देत आहे, अशा पद्धतीने तिचा संघर्ष सुरू आहे. पती सिद्धप्पा यांचे पंधरा वर्षांपूर्वी पाय लुळे पडल्याने ते घरीच बसून असतात. लिंबाबाईच्या तीन मुलांमध्ये अंबण्णा आणि काशिनाथ ही दोन मुले मुके आणि दिव्यांग असले तरी दोघेही कर्णबधिर आहेत. नशिबाने सोमनाथ नावाचा मुलगा सुदृढ जन्माला आला आहे. परंतु सोमनाथचे सध्या शिक्षण सुरू असून साहजिकच कुटुंबाची सारी जबाबदारी लिंबाबाईच्या गळ्यात पडली आहे. सुरुवातीला मिळेल ते काम करून संसार चालविणारी लिंबाबाई आज भाजीपाल्याचा व्यवसाय करते. ती रोज पहाटे अक्कलकोट येथे लिलावातून भाजी खरेदी करते अन् चपळगाव येथे सकाळ, संध्याकाळ विक्री व्यवसाय करते.
यादरम्यान गावात फिरून सगळ्या लोकांशी स्नेह ठेवत ती व्यवसाय करते हे विशेष. मिळालेल्या उत्पन्नातून सोमनाथचे शिक्षण, घरातील पतीसह दिव्यांग मुलांचा दवाखान्याचा खर्च भागविते. घरातील सगळी कामे सांभाळून दिवसभर सात ते आठ तास पायी फिरून संसार चालविणाºया लिंबाबाईचा आदर्श समाजासाठी मार्गदर्शकच आहे.
------------------------
संकटांशी दोन हात करा
- समाजात कित्येक महिलांना प्रतिकूलतेला सामोरे जावे लागते, हे खरे आहे. माझ्यावर देखील संकट निर्माण झाले तरी मी न डगमगता कष्ट करून संसार चालवित आहे. नारी ही अबला नसून सबला आहे. यातूनच संसार फुलतो. यासाठी संकट निवारणासाठी महिलांनी पुढाकार घेत दोन हात करावे. यातून आपोआप मार्ग सापडत जातो, अशा भावना लिंबाबाई रामपुरे यांनी व्यक्त केल्या.
----------------------
तीच आमची देवता: पती
- माझी दोन मुले विकलांग असून मीसुद्धा १५ वर्षांपासून पाय लुळे पडल्याने घरीच बसून असतो. माझ्या पत्नीने आम्हाला वाºयावर न सोडता आमचा सांभाळ बिनबोभाट करताना कधीही आमचे मन दुखावले नाही. आमच्यासाठी ती पायपीट करताना डोळे पाणावतात. पण आम्ही काही करू शकत नसल्याचे दु:ख मनाशी सलते. पण सारासार विचार केल्यास लिंबाबाईने आमच्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचत जग बदलले. ती आमच्यासाठी देवताच बनून आली असल्याच्या भावना पती सिद्धप्पा रामपुरे यांनी व्यक्त केल्या.
शासकीय मदत मिळावी
- आमच्या येथील लिंबाबाई रामपुरे या महिलेची कहाणी दुर्दैवी आहे. या कुटुंबाला आजतागायत कोणत्याही प्रकारची शासकीय सवलत अथवा मदत न मिळणे ही शोकांतिका आहे. शासनाचे हे अपयश असून उपेक्षित लिंबाबाईच्या कुटुंबाला शासकीय मदत मिळावी ही अपेक्षा आहे, अशी भावना अंबण्णा भंगे यांनी व्यक्त केली.